तक्रार दाखल होऊनही पंचनामा करण्यात पोलिसांची चालढकल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन सव्वादोनच्या सुमारास चार दुचाकी जळाल्या. सेक्टर पाच येथील शिवनेरीदर्शन सोसायटीसमोरील तुकाराम बाबा मढवी चाळ येथे ही घटना घडली. या संदर्भात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चाळीच्या परिसरात अनेक दुचाकी उभ्या होत्या. मोठी आग लागल्याने नागरिक भयभीत झाले. या आगीत तीन स्कूटर आणि एक मोटारसायकल भस्मसात झाली. आगीचे लोळ तीन मजल्यांपर्यंत उसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मित घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजू शिंदे, मोहझुद्दीन शहा, कांचन चव्हाण, शबाना शेख या चौघांच्या गाडय़ा भस्मसात झाल्याची माहिती राजू शिंदे यांनी दिली. मोठी आग पसरली होती. रॉकेलचा वास येत होता, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच या चार गाडय़ा अचानक जळाल्या नसून त्या जाळल्या असल्याचे दिसते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. याबाबत मध्यरात्री २.४५ वाजताच सानपाडा पोलिसांना कळवले होते, घटनास्थळी येण्याची विनंती केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पंचनामा करण्यासाठी येतो, असे सांगूनही पोलीस अद्याप आलेले नाहीत. पोलिसांनी लवकरात लवकर पाहणी करून तपास करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली.

पोलिसांना विचारणा केली असता आकस्मित घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बँक ऑफ बडोदातील चोरीच्या पाश्र्वभूमीवर सानपाडा पोलीस ठाण्यात वर्दळ आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

एकाच वेळी एकमेकांपासून काही अंतरावर असणारी वाहने जाळली आहेत. पंचनामा आणि तपासानंतरच आगीचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miscreants set ablaze four bikes at sanpada
First published on: 16-11-2017 at 02:46 IST