विकास महाडिक

अहमद जावेदसारख्या कर्तव्यदक्ष आणि दरारा असलेल्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सेवा केली आहे, पण आता हे आयुक्तालय कृप्रसिद्ध झाले असून आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचा कारभार आता विधानसभेत मांडला आहे. म्हात्रे यांच्या आरोपानंतर चौकशीअंती यात बदल होईल असा आशावाद आहे.

Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम
Mahayuti candidate Rajshree Hemant Patil took the accident victim to hospital in middle of night
यवतमाळ : मध्यरात्री अपघातग्रस्तास घेवून महायुतीच्या उमेदवार दवाखान्यात
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

नवी मुंबई पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे मागील आठवडय़ात विधानसभेत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वेशीवर टांगले.  हा त्यांच्या आरोपाचा दुसरा भाग होता. आरोप तेच होते पण ते सभागृहात केल्याने त्याला महत्त्व आले असून कार्यवाहीची अपेक्षा आहे. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई पोलिसांवर तोफ डागली होती.

मंदा म्हात्रे यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमाला वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली नाही हे त्यामागील खरं कारण होते (तोपर्यंत त्या मूग गिळून होत्या)  मात्र त्यांनी पत्रकार परिषद आणि सभागृहात केलेल्या आरोपात बऱ्याच अंशी तथ्य आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या पोलिसांचा धुमाकूळ सुरू आहे. पोलीसराज सुरू असल्याचे वातावरण आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी.’ अशा संगनमताने गुन्हेगार आणि पोलीस एकत्र नांदत आहेत. राज्यातील डान्स बार संस्कृती पनवेलमध्ये अतिरेक झाल्याने बंद करण्याचा निर्णय तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना घ्यावा लागला. ही संस्कृती त्याच पनवेल (कोन गाव) शिरवणे गावात नव्याने फोफावली आहे. केवळ त्याचे सादरीकरण बदलले आहे. तुर्भे, वाशी, येथील काही डान्स बार पहाटेपर्यंत सुरू राहात असल्याची माहिती आहे. या बार संस्कृतीसाठी विशेष खोल्या बनविल्या गेल्या आहेत. त्यासाठी खुष्कीचे मार्ग तयार करून घेण्यात आलेले आहेत. या बंद खोलीत रात्रभर छमछम सुरू असते. पैशाची दौलतजादा पूर्वीसारखीच केली जात आहे.

पामबीच मार्गावरील एका आलिशान वाणिज्यिक इमारतीतील हुक्का पार्लर सर्रास सुरू आहे. तरुण पिढी या हुक्का पार्लरचा रात्रभर आस्वाद घेत आहे. या हुक्क्याच्या धुरात काय मिसळले जात आहे याचा थांगपत्ता नाही. पोलिसांनी थातुरमातुर चार ते पाच वेळा कारवाई केली मात्र या कारवाईमुळे कमाई दुप्पट होऊ शकली आहे. नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला या डान्स बार, हुक्का पार्लरमध्ये केलेली अंर्तगत सजावट आणि बदल दिसत नाहीत. त्यांचेही खिसे गरम केले जात आहेत. उत्पादन शुल्क केवळ उत्पन्न जमा करण्यास आहे असा त्यांचा भ्रम आहे. त्यामुळे हे अवैध धंद्यांची भरभराट सुरू आहे. जुगाराचे अड्डे तर गल्लोगल्ली सुरू झाले आहेत. दिघापासून दिघोडय़ापर्यंत सध्या जुगार बिनबोभाट सुरू आहे. त्यासाठी काहीजणांनी नवीन मालमत्ता विकत घेतलेल्या आहेत. गणेशोत्सव काळ तर यासाठी सुकाळ ठरणार आहे.

पार्लरच्या आडून वेश्या व्यवसाय अधिकृत झाला आहे. बेलापूरमध्ये सर्वाधिक पब व डान्स बार झाल्याने रात्री उशिरा हा सेक्टर ११ मध्ये थायलंडच्या बँकॉकचे नवे रूप पाहण्यास मिळत आहे. चार विधानसभा असलेल्या या पोलीस आयुक्तालयात चार ते पाच हजार ट्रक रस्त्यावर रात्रीच्या वेळी भर लोकवस्तीत उभे राहात आहेत. यातील अनेक ट्रक हे विविध रसायनाने भरलेले असतात. म्हात्रे यांनी हा मुद्दा अधिक जोरकस मांडला आहे. त्यांचा राग वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्यावर आहे. संपूर्ण नवी मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रक चालकांकडून वाहतूक पोलीस आणि स्थानिक गुंड पार्किंग वसुली करीत असल्याची बाब सर्वज्ञात आहे. हे आजच नाही, गेली अनेक वर्षे राजेरोस होत आहे. भर लोकवस्तीत उभ्या राहणाऱ्या या ट्रकचालकांकडून दोनशे ते पाचशे रुपये पार्किंग शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क न देणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनांचे रात्री-बेरात्री नुकसान केले जात आहे. हा सर्व कारभार वाहतूक पोलिसांच्या कृपाशीर्वादाने सुरू आहे. या वसुलीत त्यांचाही हिस्सा आहे.

संध्याकाळनंतर परगावी जाणाऱ्या बस चालकांकडूनही वाशी, तुर्भे, कळंबोली येथे दक्षिणा घेतली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होईल अशा बसेस उभ्या असल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी सीबीडी सिडको वसाहतीत अशाच प्रकारे उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांपैकी एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तेथील अंर्तगत वाहनतळ बंद करण्यात आले. आता नवी मुंबई पोलीस रासायनिक वाहनांचा अपघात होण्याची वाट पाहात आहेत का असा सवाल उपस्थित केला गेला आहे. राज्यात गुटखा बंदी आहे पण सर्वाधिक गुटखा हा एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्री केला जात आहे. या भागात अमली पदार्थाचीदेखील विक्री होते. जेएनपीटी बंदरातून अनेक मालांची जढउतार होते. यात काही अवैध वस्तूंची तस्करी केली जाते. रक्तचंदन, लालचंदनावरील जुजबी कारवाईनंतर ही तस्करी बिनधास्त सुरू असल्याचा संशय आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पसारा खोपोलीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येथील कायदा सुव्यवस्था साभांळली जात आहे. या उच्च अधिकाऱ्यांचा पायपोस एकमेकांत नाही. शह काटशहाचे राजकारण सुरू आहे. वसुलीचे लक्ष देण्यात आल्याने पोलीस ठाण्यांना क्रमांक देण्यात आलेले आहेत.

उरण, न्हावाशेवा, एपीएमसी या पोलीस ठाण्यांना सध्या चांगले दिवस आहेत. तेथील बदलीसाठी देव पाण्यात ठेवले जात आहेत. लक्ष्मी दर्शनाशिवाय चांगली बदली मिळत नाही. त्यामुळे खाकी वर्दीला जागणारे अडगळीत पडलेले आहेत. म्हात्रे यांना माहिती देणारे हे यापैकीच काही उच्च अधिकारी आहेत. महाविकास आघाडी काळात हा गोरख धंदा फोफावला आहे, हे कळत नकळत सांगण्यात आले आहे. त्या वेळी आरोप करणाऱ्या म्हात्रे या विरोधी पक्षात होत्या. त्यामुळे त्यांच्या आरोपांची फारशी दखल घेण्यात आली नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्षात भेटून त्यांनी हे प्रकार सांगितले. पण त्यांना वाटाण्याचा अक्षता लावण्यात  आल्या. आता राज्यातील सरकार हे म्हात्रे यांच्या पक्षाचे आहे आणि गृहमंत्रीपद त्यांचे आवडते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात खांदेपालट होईल अशी किमान म्हात्रे यांना तरी खात्री आहे.

अनेक अधिकारी जावई असल्याप्रमाणे पाच-सहा वर्षे ठाण मांडून आहेत तर मलईदार पोलीस आयुक्तालय म्हणून काही अधिकारी प्रतीक्षा यादीवर आहेत. यांची यादी म्हात्रे यांनी दिली आहे त्यावर काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. नवी मुंबईत ‘व्हाइट कॉलर’ क्राइमची संख्या जास्त आहे. हे रोखण्यासाठी सायबर सेलला बळ देण्याची गरज आहे पण या सेलने नांगी टाकल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाक नावाचा प्रकार शिल्लक राहिलेला नाही. अनेक गैरधंद्यांना पोलीस प्रोत्साहन देत आहेत. अहमद जावेद सारख्या कर्तव्यदक्ष आणि दरारा असलेल्या अधिकाऱ्यांनी या पोलीस आयुक्तालयाची सेवा केली आहे पण आता हे आयुक्तालय कृप्रसिद्ध झाले असून त्याला सुदिन आणण्यासाठी तशाच अधिकाऱ्यांची गरज आहे. म्हात्रे यांच्या आरोपानंतर चौकशीअंती यात बदल होईल असा आशावाद आहे.