महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्यातर्फे करण्यात येणारी आंदोलनं हा कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. आत्ताही अशाच एका अनोख्या भूमिकेमुळे मनसे चर्चेत आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची आठवण करुन देत गजनी पुरस्कार दिला आहे. काय आहे नक्की प्रकरण? जाणून घ्या…

घणसोली कॉलनी विभागात सेक्टर ६ आणि ७ परिसरातल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्चून घणसोली नाल्यावर पूल बनवलेला आहे. पण या कामाचे काम अर्धवट केलं आहे. हे काम महानगरपालिका या पुलाचं बाकीचं काम पूर्ण करण्याचं विसरुन गेली आहे, असं सांगत मनसेने आज संबंधित अधिकाऱ्यांना गजनी २०२१ हा पुरस्कार देत प्रतिकात्मक आंदोलन केलं.

यासंदर्भात मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांनी सांगितलं, घणसोली विभागाच्या विकासासाठी मनपाने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले, त्यामाध्यमातून अनेक विकासकामं केली, पण गेल्या काही महिन्यांपूर्वीच घणसोली सेक्टर ६ आणि ७ ला जोडण्याकरता महानगरपालिकेने घणसोली नाल्यावरुन पूल बनवला होता. त्या पुलाचे काम अर्धवट करुन महानगरपालिका विसरुन गेली आहे. या ठिकाणाला सध्या जंगलाचं स्वरुप आलं आहे. इथं पथदिवे नाहीत त्यामुळे तळीराम आणि गर्दुल्यांचे साम्राज्य आहे. उद्यान विभागाच्या नाकर्तेपणामुळे सदर परिसरात गवत आणि तुटलेली झाडेच आढळून येत आहेत. तुटलेल्या फांद्या ये-जा करताना रस्त्यावर पडलेल्या आहेत. निकृष्ट दर्जाचं काम केल्याने पदपथही उखडलेले दिसत आहेत, त्याबरोबर घाण आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे.

दोन दिवसांत महापालिकेने या भागाचा प्रत्यक्ष संयुक्त दौरा मनसेसोबत करावा, असं मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. येत्या १५ दिवसांत नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसर स्वच्छ आणि चांगल्या रितीने नागरिकांच्या सोयीकरता विकसित केला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.