नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात रंगरंगोटीच्या कामाच्या दर्जा अनेक ठिकाणी सुमार होत असून यात सर्वाधिक पदपथ आणि दुभाजकांच्या कामाचा सुमार दर्जा सामान्यजनांच्या सहज लक्षात येतो. मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई मनपाने एकीकडे पहिल्या तीनमध्ये क्रमांक पटकावला असला तरी सध्या या अभियानात होणारा खर्च आणि त्यामाने कामाचा दर्जा हा चर्चेचा विषय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुशोभीकरणाचा भाग असलेल्या रंगरंगोटी प्रकारात तैलरंगामध्ये जास्त प्रमाणात रॉकेल वापरणे, भराभर काम व्हावे म्हणून दुसरा हात न देणे, कामाच्या दर्जाबाबत कुठलीही काळजी न घेणे असे प्रकार होत आहेत. पदपथाचे कठडे असो वा दुभाजक असो त्याला रंग देण्यापूर्वी पांढरा रंग देणे अनिवार्य आहे. मात्र तसे न करताच थेट पिवळा व काळा रंग देत असल्याचा प्रकार गेल्या वर्षी लोकसत्ताने उजेडात आणला होता. यावर्षी पांढरा रंग देण्यात येत आहे, मात्र तो अतिशय पातळ देण्यात येत असल्याने मोठय़ा प्रमाणावर ओघळ रस्त्यावर येत आहेत. यामुळे त्याचा सुमार दर्जा उघड तर झालाच आहे. शिवाय या कामाकडे होणारे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे किती दुर्लक्ष होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे, अशी खंत कोपरखैराणे सेक्टर १२ येथील रहिवासी प्रदीप म्हात्रे यांनी व्यक्त केली. हा प्रकार कोपरखैरणे व घणसोलीत अनेक ठिकाणी निदर्शनास आल्याचेही म्हात्रे यांनी माहिती दिली. कुठलाही रंग देण्याअगोदर पांढरा रंग म्हणजेच प्रायमर दिला तर नंतर दिला जाणारा रंग चांगला बसतो. मात्र प्रायमर व्यवस्थित दिला नाही तर त्यावर दिला जाणारा रंग कितीही चांगला दिला तरी तो बसत नाही. याच कारणाने काही काळातच हे रंग धूसर होतात. मात्र त्याला प्रदूषण आणि ऊन, पाणी आणि धुळीचे कारण दिले जाते, अशी माहिती भिंतीवर विविध पक्षी-प्राणी आदी काढणाऱ्या एका कलाकाराने दिली. जे स्वत: मनपाचेच काम करीत आहेत. याबाबत प्रयत्न करूनही संबंधित अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal officials neglect paint sidewalks dividers ysh
First published on: 26-01-2022 at 00:02 IST