कामोठे वसाहतीत दोन विविध घटनांमध्ये दोन हत्या झाल्या आहेत. यापैकी एका घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कामोठे वसाहतीमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सेक्टर-१२ येथील उमाकुंज या इमारतीमध्ये राहणाऱ्या अन्वरी (वय ३०) या महिलेवर तिच्याच पतीने हल्ला केला. क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग येऊन त्याने आपल्या पत्नीवर सुरीचे वार केले. अन्वरीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रविवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.
अन्य एका घटनेत दारू पिण्याच्या वादातून एका तरुणाची रिक्षाचालकाने हत्या केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी जितेश म्हात्रे या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. बीअरच्या दुकानांतून बाटल्या विकत घेऊन रस्त्यावर दारू पिण्याचे प्रकार कामोठेमध्ये सर्रास दिसून येतात. याच प्रकारे खुलेआम दारू पिण्यादरम्यान झालेल्या वादातून ही घटना घडली. कामोठे येथील गणेश विसर्जन तलावाजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली एक अनोळखी तरुण झोपला होता. त्याच ठिकाणी रात्री साडेआठ वाजता बीअरने भरलेल्या बाटल्या घेऊन जितेश म्हात्रे व त्याचे मित्र आले. काही वेळाने हा तरुण उठला आणि त्याने जितेशकडे बीअरची मागणी केली. त्या झटापटीत बीअर जमिनीवर पडल्याने जितेशला राग आला. त्याने जवळचा एक मोठा दगड त्या अनोळखी तरुणाच्या डोक्यात मारला, यात तो जागीच गतप्राण झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी जितेशला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
कामोठेमध्ये दोन हत्या
कामोठे वसाहतीत दोन विविध घटनांमध्ये दोन हत्या झाल्या आहेत.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 20-10-2015 at 08:10 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murders in navi mumbai