सुरक्षेच्या मुद्दय़ावर हिरानंदानी उद्योगसमूहाची निविदा गृह मंत्रालयाकडून बाद

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळाच्या स्पर्धेतून हिरानंदानी उद्योगसमूहाची निविदा सुरक्षेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप घेत बाद ठरविली आहे. त्यामुळे विमानतळ उभारणीसाठी आता तीन कंपन्यांमध्येच स्पर्धा होणार आहे. या कंपन्यांना लवकरच आर्थिक प्रस्ताव सादर करण्यास अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती सिडकोतील सूत्रांनी दिली.

नवी मुंबईत सुमारे २ हजार ६८ हेक्टर जमिनीवर १५ हजार कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने ५ फेब्रुवारी २०१४ रोजी जागतिक निविदा काढल्या होत्या. सिडकोने तयार केलेल्या विनंती पात्रता प्रस्तावानुसार (आरएफक्यू) दिल्ली आणि हैदराबाद येथील विमानतळांची उभारणी करणाऱ्या जीएमआर, मुंबई आणि बंगळुरू येथील विमानतळांची उभारणी करणाऱ्या जीव्हीके या कंपन्यांबरोबरच टाटा रियालिटी- एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर(फ्रान्स) आणि झ्युरीच एअरपोर्ट (स्वित्र्झलड)- हिरानंदानी ग्रुप यांनी निविदा प्रस्ताव दाखल केले होते. सिडकोच्या प्रक्रियेत या चारही कंपन्या पात्र ठरल्या होत्या. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने  हिरानंदानी कंपनीस सुरक्षेच्या मुद्दय़ावरून हरकत घेतली आहे.