navi mumbai bjp ganesh naik eknath shinde group ex mla | Loksatta

“आम्ही धक्का दिला तर गणेश नाईकांना भारी पडेल”, नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी!

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं आहे. असं असताना विरोधकांना हाती आयतं कोलीत मिळेल अशा काही गोष्टी घडू द्यायला नको”, असं चौगुले यावेळी म्हणाले.

“आम्ही धक्का दिला तर गणेश नाईकांना भारी पडेल”, नवी मुंबईत शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी!
गणेश नाईक आणि विजय चौगुले (संग्रहीत छायाचित्र)

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं आहे. दोन्ही बाजूंकडून वादविवाद टाळून पूर्णपणे सहकार्याने सरकार चालवण्यासाठी बद्ध असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, असं असलं, तरी स्थानिक पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. त्याचं एक उदाहरण नुकतंच नवी मुंबईत दिसून आलं. नवी मुंबईत एकमेकांचे माजी नगरसेवक आपल्याकडे घेतल्यावरून शिंदे गट आणि भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

शिवसेना ते भाजपा व्हाया शिंदे गट!

नवी मुंबईतील भाजपाचे तीन माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर हे माजी नगरसेवक देखील शिंदे गटासोबत गेले. मात्र, आता एकाच कुटुंबातील या तिन्ही नगरसेवकांचा गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपा यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

“त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे, त्यांनी…”

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं आहे. असं असताना विरोधकांना हाती आयतं कोलीत मिळेल अशा काही गोष्टी घडू द्यायला नको. नवी मुंबईच्या राजकीय नेत्यांना राजकारणाची परिपक्वता आहे. त्यांनी या गोष्टी करायला नको होत्या”, असं म्हणत नवी मुंबईतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

“त्यांचं टायमिंग चुकलं. आम्हालाही माहिती होतं की तो (गवते) जाणार आहे. पण त्यांनी आत्ता या गोष्टी घडवून आणायला नको होत्या. त्यांना हे करायला भरपूर वेळ होता. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय, त्या पार्श्वभूमीवर राजकीय परिपक्वता असणाऱ्या माणसाने या गोष्टी करणं चुकीचं आहे”, असं चौगुले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

“आम्हाला धक्के द्यायला दुसरा जन्म…!”

दरम्यान, गवते कुटुंबातील तिन्ही माजी नगरसेवक गणेश नाईक यांच्या पुढाकाराने भाजपामध्ये स्वगृही परतल्यानंतर आपल्याला धक्का बसला आहे का? अशी विचारणा केली असता “आम्हाला धक्का द्यायला लोकांना दुसरा जन्म घ्यायला लागेल. उद्या आम्ही धक्के द्यायला लागलो तर भारी पडेल”, अशा शब्दांत चौगुले यांनी इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2022 at 17:28 IST
Next Story
संदेश घरी परतण्याची आईला आशा ; चारधाम यात्रेत प्रवासादरम्यान अपघातात मृत्यू