वातानुकूलन यंत्रणा बंद; खिडक्या उघडण्याची सोयच नाही

आकर्षक आणि हरित इमारत म्हणून नावाजलेल्या नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी गेली काही दिवस घामाघूम झाले आहेत. मुख्यालयाच्या मध्यवर्ती वातानुकूल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या यंत्रणेतील ‘चिलर’चे सुटे भाग चीनहून मागविण्यात आले आहेत. ते जेएनपीटी बंदरात आले आहेत, पण दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागणार असल्याने पुढील १५ दिवस घामाच्या धारा पुसतच येथील कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे.

सुमारे १८६ कोटी रुपये खर्च करून चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले बेलापूर सेक्टर १५ येथील नवी मुंबई पालिकेचे मुख्यालय हे नवी मुंबईला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे. या इमारतीतील हवा थंड राहावी यासाठी तळमजल्यावर दोन ‘चिलर’ लावण्यात आले आहेत. त्यापैकी एक ‘चिलर’ गेले अनेक दिवस बिघडला आहे. त्यामुळे उष्माच्या झळा बंद इमारतीतही जाणवू लागल्या आहेत. बंद दालनांत काम करणारे अधिकारी कर्मचारी उकाडय़ाने हैराण होत आहेत.

नवी मुंबई पालिकेची इमारत काचेच्या तावदानांनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वातानुकूलन यंत्रणा असल्यामुळे खिडकी उघडण्याची सोयच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे हवा खेळती ठेवण्यासाठी काय करावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे. दुपारच्या वेळात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा श्वास कोंडण्याची वेळ येत आहे.

या मुख्यालयाच्या इमारतीत २२ विभागांत ६५० कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. शेकडो नवी मुंबईकर विविध कामांनिमित्त मुख्यालयात येतात. त्यांनाही वातानुकूल यंत्रणेतील बिघाडाचा फटका बसत आहे.

काही महिन्यांपूर्वी या इमारतीत घुसलेल्या उंदरांनी अनेक फाइल्स कुरतडल्या होत्या. खाडीच्या किनारी असलेल्या या मुख्यालयातील उपाहारगृहामुळे हे उंदीर मुख्यालयात स्वैर फिरत होते. त्यांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात सापळे लावण्याची वेळ पालिकेवर आली होती. काही उपाययोजना केल्यावर त्यांचा उपद्रव कमी झाला.

पालिका मुख्यालयातील इमारतीतील वातानुकूल यंत्रणेतील एका चिलरमध्ये बिघाड झाला आहे. असा बिघाड झाल्यास जनित्राची  पर्यायी यंत्रणा उभारण्यात येते. मात्र गेले काही दिवस निर्माण झालेल्या वीज तुटवडय़ामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून यंत्रणा पूर्ववत होण्यास विलंब लागत आहे. दर १०-१५ मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे एका चिलरवर संपूर्ण इमारतीचा ताण पडला आहे. आवश्यक साहित्य चीनहून मागवण्यात आले आहे. ते आल्यानंतर तात्काळ दुसरी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.      – मोहन डगांवकर, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा