नवी मुंबईतील पालिकेच्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहता पालिकेने आता बारावीपर्यंत रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी सभेत मंजूर केला जाणार आहे. अशा तीन शाळा सुरू होणार असून, त्या झोपडपट्टी भागात सुरू केल्या जाणार आहेत. मराठी माध्यमाच्या या शाळा पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असून, त्यावर सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार आहे. माध्यमिक शिक्षणासाठी पालिकेने यापूर्वीच तीन कोटी ४० लाख रुपये राखून ठेवले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे येथे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना नवी मुंबईतील पालिकेच्या ५३ मराठी शाळा सुस्थितीत सुरू आहेत.
अनेक प्रांतातून येणारे रहिवासीोवी मुंबईतील पालिकेच्या या शाळांना पसंती देत असून, शिक्षणाच्या चांगल्या सुविधांचा फायदा घेत आहेत.
नवी मुंबईच्या लोकसंख्येत झोपडपट्टीचे प्रमाण २५ टक्के असून १७ नगरसेवक या भागांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी आठवीनंतर शिक्षण अर्धवट सोडले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
अशा शिक्षण अर्धवट सुटलेल्या पण शिक्षणाची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा वरदान ठरतील, असा विश्वास महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केला.
परिमंडळ एकमध्ये एक व दोनमध्ये दोन अशा एकूण तीन रात्रशाळा सुरू केल्या जाणार आहेत. पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतींचा यासाठी वापर केला जाणार असून, एक मुख्याध्यापक व तीन अर्धवेळ शिक्षक, प्रत्येकी दोन शिपाई व लिपिक यासाठी लागणार असून त्यांच्यावर वर्षांला नऊ लाख ३३ हजार रुपये खर्च होणार आहेत. राज्य शासनाने पालिकांना अशा माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.