स्थायी सभापतींचे प्रशासनाला आदेश

शहरातील रस्त्यांवर दुतर्फा पार्किंग केलेल्या स्कूल बस आणि अवजड वाहने हटविण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रशासनाला दिले.

बुधवारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सभागृह नेते जयवंत सुतार यांनी वाशी येथील मौराज चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील मोकळ्या जागेत सुशोभीकरण करण्यात आले आहे तसेच काम नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरच्या मोकळ्या जागेत का केले जात नाही, असा सवाल केला.

स्टेडियमसमोरची जागा सुशोभीकरणासाठी का दिली गेलेली नाही, असे त्यांनी विचारले असता रस्त्याच्या दुतर्फा बाजूला स्कूल बस आणि इतर अवजड वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे या कामाला सुरुवात करणे शक्य झालेले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी कोणी दिली, प्रशासन यावर काही कारवाई करणार आहे का, असे प्रश्न बैठकीत विचारण्यात आले. या वेळी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी भीमाशंकर सोसायटीनजीकच्या एका भूखंडावर राडारोडा टाकून ठेकेदार डम्पर उभे करीत असल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. अशा पद्धतीने अन्य विभागांतही रस्त्याकडील जागेत बेकायदा पार्किंग केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर सर्वच नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली. सभापती शिर्के यांनी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हण यांना ठाणे-बेलापूर मार्ग, शीव-पनवेल महामार्ग, तसेच पाम बीच मार्गाच्या दुतर्फा असलेल्या वाहनांना हटविण्याचे आदेश दिले.