सतरा प्लाझा परिसरातील आस्थापनांना नोटिसा, कारवाई सुरूच

सतरा प्लाझा आणि परिसरातील आस्थापनांच्या बेकायदा वॅलेट पार्किंगमुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी पाम बीच मार्गाच्या दिशेला भिंत बांधण्यात यावी, अशी नोटीस पालिका सर्व आस्थापनांना पाठवणार आहे. गेले आठ दिवस येथे बेकायदा पार्किंगवर सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. प्रवेशच चुकीच्या बाजूने करत असल्याने व्यावसायिकांनी भिंत घालावी, अन्यथा पालिका तेथे भिंत घालून खर्च वसूल करेल, अशी सूचना करण्यात येणार आहे.

महापालिका व वाहतूक विभागाने या परिसरात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली आहे. त्यामुळे येथील दुकानदारांनाही भविष्यातील व्यवसायाबाबत धास्ती निर्माण झाली आहे. पाम बीच हा शहरातील सर्वात वेगवान मार्ग असूनही पार्किंगमुळे ही वाट अरुंद असे. गेल्या शुक्रवारपासून पालिकेने हाती घेतलेल्या धडक कारवाईमुळे रस्ता रिकामा झाला. आठ दिवस अनेक दुकाने बंदच होती, तर काही दुकाने उघडी असली तरी कोणतीही वाहने पार्क करू दिली जात नव्हती. परिसरातील वेअर हाऊस व विविध हॉटेल, मॉलचे प्रवेशद्वार पाम बीचच्या मागील सेवारस्त्यावर असूनही नियम धाब्यावर बसवून व्यावसायिक वापरासाठी दुकानांचे प्रवेशद्वार पाम बीच मार्गाच्या बाजूला काढण्यात आले आहे. ते कायमचे बंद व्हावे यासाठी भिंत बांधण्यात येणार आहे. याबाबत लवकरच कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.

२ लाखांचा दंड वसूल

८ सप्टेंबरपासून या परिसरात सातत्याने १५३ वाहनांवर केलेल्या कारवाईत २ लाख १० हजार ७०० एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. आणखी ८ दिवस म्हणजेच २२ सप्टेंबपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंगबाबत ठोस उपाययोजना करत आहोत. परिसरात भिंत घालणार आहोत. तेथील व्यवसायिकांनी नियमानुसार भिंत घालून पामबीचकडील बेकायदा प्रवेश बंद करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. अन्यथा पालिका भिंत बांधून पैसे वसूल करेल. पामबीचकडील प्रवेशच कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. 

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका