पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यापूर्वी पनवेलकरांचे सध्याचे आर्थिक, सामाजिक व भौगोलिक प्रश्नांवर विचार करून त्यावर तोडगा काढा, नंतरच नवीन महानगरपालिका स्थापन करा, अन्यथा सरकारचे हे धाडसी पाऊल पनवेलकरांसाठी आगीतून फुफाटय़ात गेल्यासारखे होईल, अशी भीती पनवेल शहरातील शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी कक्षप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्याकडे केलेल्या मागणी निवेदनात व्यक्त केली आहे. सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली अभ्यास समिती २४ डिसेंबपर्यंत सरकारला महानगरपालिकेचा अहवाल सुपूर्द करणार आहे. सोमण यांनी सत्रे समितीला दिलेल्या सूचनापत्रामध्ये १३ सूचनांचा उल्लेख आहे. महानगरपालिका करण्याअगोदर सिडको, नैना, महसूल व एमएमआरडीए या चारही प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यप्रणालींमध्ये स्पष्टता असावी, प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारांची स्पष्टता तसेच प्रस्तावित महानगरपालिकेची कर निश्चिती करताना संबंधित ठिकाणचे वास्तव जाणून घ्यावे. त्यानंतर तेथील कर निश्चित करावेत. सिडकोने पायाभूत सुविधांचे प्रस्तावित भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याची वेळ निश्चिती करावी, गेल्या वीस वर्षांपासून सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेला पायाभूत भूखंड दिलेले नाहीत याची जाणीव ठेवावी, पनवेलकरांना रोज भेडसावणारा पाणी प्रश्न प्रस्तावित महानगरपालिका स्थापन झाल्यावर कसा व कुठून सोडवणार हे अहवालात जाहीर करावे. अन्यथा विणापाण्याची महानगरपालिका असे म्हणण्याची नामुष्की सरकारवर येईल, असे सोमण यांनी म्हटले आहे. आजही पनवेलच्या अध्र्याअधिक परिसरात दिवसातून तीन वेळा वीज गायब झाल्याशिवाय राहात नाही. यासाठी पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगत करून रखडलेल्या वीज उपकेंद्राचे प्रकल्प कार्यान्वित करावेत. पनवेल परिसरात एकही सरकारी महाविद्यालय नाही. गेल्या चार वर्षांपासून पनवेलमधील सरकारी रुग्णालयाचे कामही रखडले आहे, अशीच अवस्था सार्वजनिक वाहतुकीचीदेखील आहे. महानगरपालिकेचा प्रस्तावित अहवाल तयार करण्यापूर्वी सत्रे समितीने येथील जनतेच्या भावना जाणून घ्याव्यात, अशा सूचना सोमण यांनी मांडल्या आहेत. सोमण यांच्या सूचनापत्राचा विचार करून लवकरच पनवेलमधील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावू, असे आश्वासन आयुक्त सत्रे यांनी दिले आहे.

सेनेचे नवीन पदाधिकारी फलकबाजीत मग्न
सोमण हे सेनेचे माजी पदाधिकारी आहेत. जे काम शिवसेनेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे, ते काम सत्तेत असलेल्या सेनेचे माजी पदाधिकारी सोमण करत असल्याने पनवेलकरांची चिंता माजी सैनिकालाच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेचे नवनियुक्त पदाधिकारी स्वत:चे ओळखपत्र छापण्यात, फलकबाजी करण्यात व पालिका झाल्यास मी कोणत्या प्रभागातील नगरसेवक असेन यामध्ये मग्न झाल्याने पनवेलच्या प्रस्तावित महापालिकेवर शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी सिडको प्रशासनाच्या स्मार्ट सीटी, नैना प्रकल्पाला सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी असाच लेखी विरोध केला होता.