पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पालिका नवीन पनवेल येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत असून या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जून अखेरीस हे बांधकाम पूर्ण होणार आहे. नुकतेच पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन कामाचा आढावा घेतला.

पनवेल महापालिकेच्या सदस्यांनी सभागृहात ठराव करुन सिडको महामंडळाकडून क्रिकेट प्रशिक्षणासाठी नवीन पनवेल येथील आदई सर्कलशेजारचा २८ हजार चौरस मीटरचा भव्य भूखंड मिळविला. या भव्य भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने पालिकेने येथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी भव्य मैदान बांधले आहे. तब्बल १२ कोटी रुपये पालिका या प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करत आहे. पुढील नऊ वर्षे देशाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला हे प्रशिक्षण केंद्र पालिका देखभाल व प्रशिक्षणासाठी देण्याचे पालिका सदस्यांनी ठरविले आहे.

हेही वाचा – मुंबईतील फलक दुर्घटना : पनवेल पालिका सतर्क, व्हीजेटीआयकडून स्ट्रक्चरल ऑडीट करून अहवाल देण्याबाबत पालिकेची नोटीस

हेही वाचा – उरण- पनवेल मार्गावर चार वाहनांचा एकत्रित अपघात

वेंगसरकर यांची प्रशिक्षण संस्था वर्षात शंभर प्रशिणार्थींना या मैदानात क्रिकेटचे धडे देणार आहे. शंभर प्रशिक्षणार्थी निवडताना पनवेल पालिका क्षेत्रातील ५० तसेच रायगड जिल्ह्यातील २५ व राज्यातील २५ या निकषावर प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जुलै महिन्यात दिलीप वेंगसरकर प्रशिक्षण संस्थेकडे हे मैदान हस्तांतरण झाल्यानंतर यंदाच्या दिवाळीपासून या मैदानातून क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. वेंगसरकर यांची संस्था या मैदानाच्या देखभालीचा खर्च विविध कंपन्यांच्या कोर्पोरेट सोशीअल रिस्पॉन्सिब्लिटी (सीएसआर) निधीतून करणार आहे. तसेच या मैदानामध्ये विविध क्रिकेट सामन्यांच्या मालिका आयोजित करुन त्यामधून मिळणाऱ्या नफ्यातून या प्रशिक्षण केंद्राची देखभाल वेंगसरकर यांच्या संस्थेला करावी लागणार आहे.