पंचाय समितीत शेकापचा झेंडा
रायगड जिल्हा परिषदेच्या चार तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी उरणमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवार लागला. यात जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी दोन जागा काँग्रेसने जिंकल्या, तर शिवसेना व भाजपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. उरण पंचायत समितीच्या आठ गणांपैकी शेतकरी कामगार पक्षाला सर्वाधिक चार जागा मिळाल्या. शिवसेना व भाजपने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता उरण पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार, कोणता पक्ष शेकापला मदत करणार, शिवसेना व भाजप एकत्र येणार का, यावर तर्क लढवले जात आहेत. दोन्ही ठिकाणी समान जागा असल्याने पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या नवघर गटातून शिवसेनेचे विजय भोईर(६८०१)विजयी, जासई गटातून कुंदा वैजनाथ ठाकूर-काँग्रेस शेकाप आघाडीच्या (८,७९५)विजयी, चाणजेमधून भाजपाच्या रिना जितेंद्र घरत (७,३२४)विजयी, चिरनेर मतदारसंघातून काँग्रेस-शेकाप आघाडीचे बाजीराव परदेशी (९,७०३) विजयी, नवघर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे दीपक ठाकूर (२,९०६) विजयी, भेंडखळमधून शिवसेनेचे हिराजी घरत (२,७१९) विजयी, जासई गणातून शेकाप काँग्रेस आघाडीचे नरेश घरत (३,५०१) विजयी, विंधणेमधून भाजपच्या दिशा प्रसाद पाटील (५,०७१) विजयी, केगाव मतदारसंघातून शेकाप काँग्रेसच्या वैशाली नीलेश पाटील (२४००) विजयी, चाणजे गणातून भाजपचे दीपक चिवेलकर (३,८२२) विजयी, चिरनेर पंचायत समितीमध्ये शेकाप काँग्रेस आघाडीच्या शुभांगी सुरेश पाटील (५,२८६) तर आवरे गणातून शेकाप काँग्रेस आघाडीच्या समिधा नीलेश म्हात्रे (६,६३०) विजयी यांनी बाजी मारली आहे.
मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या मतमोजणीच्या वेळी न्हावा-शेवा बंदर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. बुधवंत तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संपत डावखरे यांनी काम पाहिले.
