तीन आठवडय़ांपासून कोपरखैरणेत एकही असा दिवस गेला नाही, ज्या दिवशी दोनपेक्षा कमी वेळा वीजपुरवठा खंडित झाला नाही. यात सर्वाधिक वीज समस्या ही सेक्टर- १९ सीमध्ये सुरू असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत.

आज वाशीत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नवी मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व पाऊस कधीही पडेल असे वातावरण असल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यातच कोपरखैरणेत ज्या ठिकाणी सर्वाधिक विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो ते सेक्टर- १९ हे खाडीकिनारी असल्याने उकाडा जास्त जाणवतो. असे असले तरी शंभर टक्के वीज बिल वसुली होत असणाऱ्या नोडमध्ये वीजपुरवठा मात्र नियमित होत नसल्याने महावितरणविरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. मागच्या एकाच आठवडय़ात मान्सूनपूर्व कामासाठी म्हणून आठ तासांपेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर केवळ दोनच दिवसांनी वाशीहून होणाऱ्या वीजपुरवठय़ात बिघाड झाल्याने काही भागात तीन, तर सेक्टर- १९ मध्ये सात तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वाशीहून वीजपुरवठा सुरळीत करतानाच एकाच केबलला चार ते पाच ठिकाणी जोड दिल्याचे समोर आले होते. तेव्हाही वेळ मारून नेली, मात्र पुन्हा ही समस्या उद्भवून वाशीतील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, असे कंत्राटी कामगाराने सूचित केले होते. मात्र जेव्हा समस्या येईल तेव्हा पाहू, असे सांगून महावितरण प्रशासनाने वेळ मारून नेल्याचे समोर आले आहे. बुधवारी वाशीतही विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

वीजपुरवठा खंडित होतो हे मला माहिती नव्हते, कदाचित फ्यूज जात असेल, मी पाहून घेतो. लोकांनीही उन्हाळ्यात एसीचा वापर केल्याने लोड येत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असेल.   – विलास सोनकुदरे, कनिष्ठ विद्युत अभियंता, कोपरखैरणे