पनवेल : तालुक्यातील गावठाणांचे स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षणाचा कार्यक्रम भूमिअभिलेख विभागाने हाती घेतला असून यातून पनवेलची गावठाणे संरक्षित होणार आहेत. कर्नाळा गावापासून पाच दिवसांपूर्वीपासून प्रत्यक्ष या योजनेच्या कामाला सुरुवात झाली.
सरकारने गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. यानुसार या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. गावठाणांचे सर्वेक्षण होणार असल्याने सरकारी
जागांची मालकी व मिळकती निश्चित होणार आहेत. यातून सरकारी जागांवरील ताबा वाद समोर येऊ शकतील. तसेच गावठाणांच्या मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमासुद्धा निश्चित होतील. मालमत्तांचे क्षेत्र किती आहे याची माहिती जाहीर होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे संबंधित जागेची मालकी हक्काचा अभिलेख मिळकत पत्रिका ( प्रोपर्टी कार्ड) तयार होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलमधील ग्रामस्थांची ही मागणी होती. मिळकत पत्रिका तयार झाल्याने संबंधित ग्रामस्थांना त्या जागेवर घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होईल.
ग्रामपंचायतीच्या जागा, सीमा निश्चित होणार
या सर्वेक्षण कार्यक्रमामुळे जागा गावठाणांची असली तरी त्या मालमत्तेचे मिळकत पत्र मिळत नव्हते. तसेच गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होण्यास या सर्वेक्षणात सुस्पष्टता येईल. सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाल्यावर प्रॉपर्टी कार्ड पनवेलच्या ग्रामस्थांना https:// digitalsathara. mahabhumi. gov. in संकेतस्थळावरून सहज उपलब्ध होणार आहे.
ग्रामस्थांनी या सर्वेक्षणाला सहकार्य करावे तसेच ८-अ च्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. आपल्या स्वत:च्या मिळकतींचे चुन्याच्या साहाय्याने अचूक सीमांकन करावे, ग्रामस्थांनी त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते ग्रामसेवक अथवा संबंधित सर्वे कर्मचाऱ्यांना दयावेत.
-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protection panvel villages survey started karnala village drones ownership scheme department land records survey amy
First published on: 16-04-2022 at 00:28 IST