शिबिरांच्या माध्यमातून होणारी सामाजिक जडणघडण हे एक महत्त्वाचे योगदान ठरते. नेरुळ येथील सहयोग संकुलदेखील अशी विविध शिबिरे आयोजित करून संकुलाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सहयोग अपार्टमेंट, नेरुळ
नेरुळ येथील ‘सहयोग अपार्टमेंट’ हे गजबजलेल्या रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर आहे. त्याचबरोबर सदैव शांतीचे वातावरण लागणाऱ्या वृद्धाश्रमाच्या बाजूलाच वसलेले आहे. त्यामुळे बाजूला आश्रम असल्याने नेहमीच येथे शांतता ठेवली जाते. शंभर उंबरठे मिळून एक गाव तयार होते असे म्हटले जाते. ही सोसायटीदेखील १५० उंबरठे मिळून आमचे एक गावच आहे, अशी विचारधारा येथील रहिवाशी ठेवत असतात. मग आपल्या संकुलाच्या भल्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. संकुलातील प्रत्येक नागरिक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संतुलित आहार शिबीर घेतले जाते. या शिबिरातून नागरिकांनी आहार कसा ठेवला पाहिजे, त्यांच्या शरीरासाठी कोणते पदार्थ पचनशील असतील, कोणते जीवनसत्त्व कसे आणि किती प्रमाणात खाल्ले पाहिजेत या सर्वाचे मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर सुरक्षा शिबिरातून, कठीण वेळेप्रसंगी आपण स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकतो याचेदेखील धडे दिले जातात. लहान मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी काय केले पाहिजे यावर शिबिरे घेतली जातात. त्या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर भर दिला आहे. आरोग्य शिबीर हे नियमितचे शिबीरदेखील होतच असते.
सिडकोच्या वसाहतीपैकी ३० वर्षे जुनी ही वसाहत, त्या वेळी सिडकोने वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा न ठेवल्याने येथे पार्किंगची समस्या भेडसावत आहे, त्यातूनसुद्धा येथील रहिवाशांनी आपल्या घरासमोर एका बाजूला वाहने पार्क करून थोडय़ा प्रमाणात समस्या मार्गी लावली आहे. या संकुलात खूप आधीपासूनच कूपनलिका काढण्यात आलेली आहे. पाण्याची समस्या उद्भवल्यास या कूपनलिकेचा उपयोग केला जातो. या संकुलातील महिला एकत्र येऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात. आज शहरात ठिकठिकाणी बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. बहुतांशी महिला फक्त या बचत गटात महिन्याची गुंतवणूक करीत असतात. येथील महिलांनी बचत गट स्थपन करण्यामागचा हेतू साध्य केला आहे. येथील गृहिणींनी लघुउद्योग सुरू केला असून घर सांभाळत फावल्या वेळी एक्साम पॅड बनवीत आहेत. यातून त्यांना स्वत:च्या मेहनतीवर आर्थिक लाभ मिळत आहे. यातून महिन्याभराच्या कमाईतून त्या महिलांनी एक हौशी गट स्थापन केला आहे. या हौशी गटाच्या माध्यमातून मनोरंजन होण्यासाठी, एक वेगळा दिवस अनुभवण्यासाठी लहान मुलांना सोबत घेऊन सहल काढली जाते. महिला या सहलीचा मनसोक्त आनंद लुटतात. सोसायटी अंधारात हरवू नये याकरिता ठिकठिकाणी छोटय़ा टय़ूबलाइट लावण्यात आल्या आहेत. या बंद पडल्या की दुरुस्त करून तात्काळ बसविल्या जातात.
समाजात दिवसेंदिवस वाढणाऱ्या विचारांच्या घोळाचा परिणाम सामाजिक जीवनावर होताना दिसतो. समाज सुशिक्षित नाही किंवा समाजात आदर्शाची भावना नाही, अशी खंत अनेकदा सामाजिक स्तरावर व्यक्त होताना दिसते. ज्या देशाचा नागरिक सुशिक्षित, तो समाज सुसंस्कृत अशा विचारांची सांगड घालणारे विचारधन सर्वाच्या मनात उतरवण्याची गरज आहे.
अन्नदानाचा सदुपयोग
संकुलाच्या लगतच महिलांचे वृद्धाश्रम आहे. येथील हौशी महिला या आश्रमातील महिलांना महिन्यातून एक दिवस मांसाहारी जेवण खाऊ घालतात. त्यांना ज्या पद्धतीचे पदार्थ आवडतात त्या पद्धतीने बनवून दिले जाते. तेथील महिलांना- वृद्ध महिलांना त्यानिमित्ताने निदान घरच्या जेवणाची चव चाखायला मिळावी या हेतूने आम्ही देत असल्याचे या हौशी महिलांनी सांगितले.
पूनम धनावडे