मशिदीच्या विरोधात महामार्गावर दोन तास रास्ता रोको

स्थानिकांचा विरोध डावलून सानपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या मशिदीच्या निषेधार्थ मंगळवारी स्थानिकांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान आंदोलकांनी सकाळी शीव-पनवेल महामार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास बंद होती.  पोलिसांनी सुमारे ८०  जणांना याप्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची जामिनावर सुटका केली.

सानपाडा येथे २०१२ मध्ये मशिदीसाठी भूखंड देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, हे आरक्षण बेकायदा असल्याचा दावा अखिल सानपाडा रहिवासी महासंघाने केला आहे. त्यानंतरही या मशिदीचे बांधकाम सुरू झाल्याने महासंघाच्या वतीने मंगळवारी सानपाडा बंद पुकारण्यात आला होता. सानपाडा परिसरातील मुस्लीम कुटुंबांची संख्या कमी असल्याचा  महासंघाचा दावा आहे. मशीद उभारल्यास या परिसरातील सांप्रदायिक वातावरण दूषित होईल, असा दावाही महासंघाने केला होता.

मशिदीच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान सानपाडा परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी दहा वाजता महाआरती करून पाच हजारपेक्षा अधिक स्थानिक रहिवासी शीव-पनवेल महामार्गावर धडकले. याठिकाणी आंदोलकांनी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत शीव-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वाहतूक कोंडी आणि आंदोलकांच्या गर्दीत होत असलेली वाढ पाहून पोलिसांनी अधिक कूमक मागवून घेतली. पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच मुख्य रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. महापालिका नगररचनाकर सतीश उगले आणि उपआयुक्त पटनीगीरे यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन बांधकाम थांबविण्याची घोषणा केल्यावर पोलिसांनी ८२ आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्त्यावरून हटवले. मात्र तरीही काहींनी मुंबईकडील वाहतूक अडवून धरली. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना हटवून वाहतूक सुरळीत केली.

पालिकेने बांधकाम थांबवले असून परवानगी रद्द करण्याबाबत मुख्यालयात बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भात बुधवारी होणाऱ्या बैठकीत नेमके चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार आम्ही आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार आहोत. मात्र, मशिदीला आमचा विरोध कायम आहे.

-कैलास ताजने, संघर्ष समिती