नवी मुंबई : कोपरखैरणे विभागात वाहन पार्किंग ही समस्या गंभीर झाली आहे.  अंतर्गत सर्व रस्त्यांवर दिवस रात्र दुतर्फा पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यात आता अनेक ठिकाणी ट्रक, डंपर, टेम्पो ही वाहनेही उभी केली जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वर्तवला जात आहे.

या विभागात रस्ते छोटे आहेत.  त्यात पार्किंगसाठी कोणतेही नियोजन नसल्याने जागा मिळेत तिथे वाहने उभी केली जात आहेत.  नागरिकांनी येथील मोकळ्या मैदानांचे वाहनतळ केले होते. संतोषीमाता मैदान, एकता मैदानांचा मुलांना खेळण्याऐवजी वाहनांच्या पार्किंगसाठी वापर केला जात होता. त्यावर आता बंदी घातल्याने आपले वाहन उभे करण्यासाठी नागरिकांना जागेच्या शोधात तासतास घालवावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी असतात.  हे कमी की काय म्हणून आता अवजड (ट्रक, डंपर, टेम्पो) वाहनेही आता उभी केली जात आहेत. बोनकोडे भागात अनेक प्रवासी बस उभ्या असतात. या वाहनांवर कारवाई करण्याबाबत विचारणा करण्यात आली तर पार्किंगला जागाच नाही तर या वाहनचालकांनी वाहने पार्किंग करावे, असा प्रतिप्रश्न केला जातो.

कोपरखैरणे विभाग कार्यालयासमोर असलेल्या निमुळत्या जागेत सर्वाधिक ट्रक उभे असतात. हे ट्रक पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे असल्याने त्याकडे वाहतूक पोलीसही दुर्लक्ष करतात, असा आरोप येथील एका रहिवाशाने केला. मात्र आमचे ट्रक येथे उभे नसतात असे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले.

अशा वाहनांवर वारंवार कारवाई केली जाते. गल्लीत जड अवजड वाहने पार्क करणे बेकायदाच आहे. त्यावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

-उमेश मुंढे, साहाय्यक पोलीस निरीक्षक