लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात लोकसभा निवडणुकांचा धडाका सुरू आहे. मुंबई व परिसरात सोमवारी (ता.२०) मतदान पार पडले. सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ऐरोली विभागात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या ऐरोली सेक्टर १५ येथील स्वामी विवेकानंद उद्यानात श्रमपरिहार केल्याचे पाहायला मिळाले.

पालिकेची उद्याने शहरातील आबालवृद्धांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे आहेत की तरुणांसाठी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार करण्याची ठिकाणे आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-पनवेल: सरकारी पोस्ट कार्यालयाबाहेर छप्पर टाकण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

मतदानानंतर सार्वजनिक जागा असलेल्या उद्यानांमध्ये याच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार पाहायला मिळाला. उद्यानातच होत असलेल्या पार्ट्यांबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उद्यानातील खुलेआम प्रकाराबाबत पालिका व पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. त्यामुळे पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. याबाबत पालिका विभाग अधिकारी अशोक अहिरे व ऐरोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सुरक्षारक्षक नावालाच?

ऐरोलीतील सेक्टर १५ येथील स्वामी विविकानंद उद्यानात मद्या पार्ट्या होत असताना या उद्यानात एक देखभाल दुरुस्ती व सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. पण तो उपस्थित असताना हा प्रकार सुरु असल्यामुळे नक्की पालिका करते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या उद्यानातील परिस्थितीबाबत एका नागरीकाला विचारणा केली असता या ठिकाणी रात्रीच्यावेळी चक्क उद्यानात दारुचा अड्डा बनलेला असतो. त्यामुळे परिसरातील महिला व मुली या उद्यानात फिरकत नसून स्थानिक राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.