scorecardresearch

घारापुरीच्या विकास आराखडय़ास गती? ;धरण दुरुस्तीच्या कामासाठी पाच कोटींचा निधी

घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री तथा पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

उरण : घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ातील विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री तथा पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी बैठक झाल्यानंतर वरील आदेश देण्यात आले आहेत.
घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर यांनी, घारापुरी बेटाच्या विकासासाठी व बेटाचा कायापालट होईल असा विकास आराखडा पर्यटन विभागाने तयार केला आहे. या विकास आराखडय़ाला ८ सप्टेंबर २०२१ रोजी उच्चस्तरीय झालेल्या बैठकीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडून मंजुरीही देण्यात आलेली आहे. मात्र कामाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. बेटावरील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला गळती लागली आहे. जल मिशन योजनेअंतर्गत सदरच्या धरणाच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी पाच कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. बेटावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीकडे स्वागतकक्ष नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवडी न्हावा सी-लिंकबाधित बेटावरील मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. तसेच भारतीय पुरातत्त्व विभाग व शासकीय गाइड यांच्याकडून लोकल गाइड यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याच्या बाबींकडेही त्यांनी लक्ष वेधले.
घारापुरी बेटाच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तयार करण्यात आलेल्या मंजूर विकास आराखडय़ातील कामांना गती देऊन विकासकामांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. बेटवासीयांची पाणी समस्या दूर करण्यासाठी गळती लागलेल्या धरणाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, एमटीडीसीचे साहाय्यक अभियंता नागरे,उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, तसेच आजी-माजी पदाधिकारी व महसूल विभागातील अधिकारी वैजनाथ ठाकूर भावना घाणेकर , पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने बैठकीला उपस्थित होते.
स्वागत कक्ष
शिवडी – न्हावा सी-लिंकबाधित मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई आणि बेटावर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीला बंदर विभागाच्या माध्यमातून स्वागत कक्ष बांधून देणे आदी विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Speed gharapuri development plan fund dam repair work maharashtra tourism development corporation amy