पनवेल ः कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या गोदामामध्ये यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. दोन दिवसांपूर्वी लोखंड पोलाद बाजारातील गोदाम क्रमांक ४४९ मध्ये ४ लाख ८१ हजार ५०४ रुपयांचा गुटख्याचा साठा नवी मुंबई पोलिसांना सापडल्याने लोखंड पोलाद बाजारातील काळेधंदे पुन्हा एकदा उजेडात आले आहेत.

नवी मुंबई पोलीस दलाचे आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांना कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात अत्ताऊल्ला शेठ याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलीस दलाच्या अंमलीपदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, उत्तम लोखंडे, गणेश पवार, पोलीस नाईक संजय फुलकर यांच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये अताऊल्ला याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखुचा साठा आढळला. यापूर्वीसुद्धा याच परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्यानंतरसुद्धा अताऊल्ला याने गुटख्याचा साठा केल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

हेही वाचा – पनवेलमध्ये बेकायदा फलकांचे तोडकाम दोन दिवसात

हेही वाचा – आईने सहा वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खासगी व्हिडीओ, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

अताऊल्ला याला पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांची साथ असल्याने वारंवार कारवाई होऊनही पनवेल, कळंबोली, कामोठे, तळोजा या परिसरात राजरोज पानटपऱ्यांवर गुटख्याची विक्री सुरु आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक अंमली पदार्थ विकणाऱ्यांना पकडत आहे. मात्र पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागातील काही नतद्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे अंमलीपदार्थ पकडण्यासाठी नेमलेल्या पोलिसांना गुटखा विक्रीकडे लक्ष्य केंद्रित करावे लागत आहे. अताउल्ला याची सखोल चौकशी केल्यावर त्याने एवढा मोठा गुटख्याचा साठा कुठून आणला. तसेच गोदामात पोलिसांनी धाड टाकण्यापूर्वी आणि धाड टाकल्यानंतर त्याने कोणकोणत्या पोलिसांना व सरकारी अधिकाऱ्यांना संपर्क केला याची सखोल चौकशी केल्यास पनवेलचा अवैध गुटखा व्यापारावर काही प्रमाणात प्रतिबंध लागू शकेल.