एखाद्या आनंदाच्या प्रसंगी तोंड गोड करून आनंद द्विगुणित करणाऱ्या मिठाईची गोडी यंदाच्या दिवाळीत त्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मात्र कमी झाली आहे. दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थाची रेलचेल जरी सुरू असली तरी ग्राहकांची रेलचेल अजूनही म्हणावी तितकीशी दिसत नाही. मिठाईचे भाव गगनाला भिडले असल्याने ती खरेदी करताना ग्राहकांची तोंड मात्र कडू होत आहे.
बाजारात साधारण मिठाई ४०० ते ८०० रुपये किलो आहे. मागील वर्षांच्या तुलनेत किलोमागे १०० ते १५० रुपयांनी मिठाईची भाववाढ झाली आहे. सफेद पेढा ४०० रुपये किलो, केसर पेढा, मलाई पेढा ५०० रुपये किलो झाला असून बर्फीचेही दर वाढले आहे. पिस्ता, मलाई बर्फी ५०० रुपये किलोपर्यंत बाजारात मिळत आहे. काजू कतरी ६०० रुपये किलो आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करायची कशी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
चोकोबार रोल ५०० रुपये, तर ड्रॉयफ्रूटच्या कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, मँगो आकाराची मिठाई ८०० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. मोतीचूर, चुरमा लाडू ३०० रुपये किलो असून सोनपापडी बदामी सोनपाडी ३०० रुपये किलो आहे. खोबऱ्याचे लाडू ३८० रुपये किलो आहे, तर दिवाळीसाठी स्पेशल सुकामेवा मिक्स खास मिठाईची पाकिटे उपलब्ध असून ८५० रुपये किलोपर्यंत आहे. तसेच बाजारात बिनसाखरेचीदेखील मिठाई असून त्याचे दर ४५० रुपये किलोपर्यंत आहे.
भेटवस्तूंमध्ये चॉकलेटकडे कल
दिवाळीसाठी भेटवस्तूंची देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणावर होते. घरी तयार केलेला फराळ विविध प्रकारच्या मिठाई मित्रमंडळी व स्नेहींना दिल्या जातात. मिठाईपेक्षा चॉकलेटच्या पदार्थाना टिकाऊपणामुळे मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळत आहे. पूर्वी घरी तयार केलेले दिवाळीच्या फराळाचे पदार्थ शेजारी व नातेवाईकांना देण्याची परंपरा होती. ती काहीशी थंडावली असून याउलट कॉर्पोरट संस्कृतीस चालना मिळत आहे. त्यामुळे मिठाई, चॉकलेट भेट म्हणून देण्याचे प्रमाण वाढत आहे. अगदी कौटुंबिक स्तरावरही याच प्रकारच्या भेटी देण्याचा कल वाढत आहे. नवी मुंबईतील मॉलमध्ये आकर्षक वेष्टनात बंदिस्त केलेल फ्लेवर, रंगरूपांतील चॉकलेट खरेदीदारांना भुरळ पाडत आहे. विविध आकाराच्या खोक्यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात हे चॉकलेट बांधून दिले जात आहेत. चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकांनामध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येत आहे. काही बेकरीवाले घरातच चॉकलेट बनवत असून महिला बचत गटाच्या माध्यमातूनदेखील चॉकलेट बनवण्यात येत आहे. रंगीबेरंगी झगमगीत कागदात गुंडाळून ही चॉकलेट लहान-मोठय़ा खोक्यांमध्ये भरली जात आहे. मॉलमध्ये विक्रीस ठेवलेले चॉकलेट गुजरात मधूनदेखील विक्रीसाठी आले आहे. चॉकलेट हे १०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत आहे. प्लेन चॉकलेट, अ‍ॅनिमल बटरफ्लाय, लव्ह, ट्रेन्गल, स्टार आदी प्रकारात चॉकलेटस् उपलब्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweets rate increase in diwali
First published on: 05-11-2015 at 00:01 IST