बससेवेच्या मागणीकडे दुर्लक्ष
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ५० हजार कामगारांना जवळच्या रेल्वेस्थानकांत जोडणारी बससेवा सुरू करण्यात प्रादेशिक परिवहन विभागाला अद्याप यश आलेले नाही. ही बससेवा सुरू व्हावी यासाठी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या संघटनेने (टीएमए) नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवा (एनएमएमटी) आणि प्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. येथील कामगारांना रेल्वेस्थानक गाठण्यासाठी कळंबोली सर्कल येथे येऊन नंतरच पुढील प्रवास करावा लागतो. दरम्यान, कारवाईच्या धसक्यामुळे दिवाळीत बंद झालेल्या रोडपाली नोड येथील इकोव्हॅनची बेकायदा प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
तळोजा एमआयडीसी येथून नावडे नोड, त्यानंतर रोडपाली पोलीस मुख्यालयाकडून पुरुषार्थ पंपावरून खारघर रेल्वेस्थानक या टप्प्यात एनएमएमटीची बससेवा मिळावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. एनएमएमटीने चालू वर्षांत कामोठे, खांदेश्वर, पनवेल शहर, तळोजा पाचनंदनगर या ठिकाणी यशस्वी बससेवा सुरू केली. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी पनवेलमध्ये पहिल्यांदा एनएमएमटीने बससेवा सुरू करण्याचा निर्णय झाला तेव्हाच तळोजा एमआयडीसीमध्ये बससेवा सुरू करण्यात आली. मात्र या बससेवेला स्थानिक सहाआसनी रिक्षाचालकांनी विरोध केल्यामुळे एनएमएमटीने तेथून काढता पाय घेतला. पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी ऑक्टोबरमध्ये एस. टी. महामंडळ व एनएमएमटी प्रशासनाला पत्र लिहून, या परिसरात बससेवा सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांनीही नोव्हेंबरमध्ये एनएमएमटी प्रशासनाला स्मरणपत्र दिले आहे. तरीही कोणतीच हालचाल न झाल्याने तळोजा वसाहतीमधील कामगार व उद्योजकांसाठी काम करणाऱ्या तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनने (टीएमए) नाराजी व्यक्त केली आहे.
द्राविडी प्राणायाम..
मुंबईहून तळोजा एमआयडीसीमध्ये जाणारे प्रवासी सीबीडी-बेलापूर स्थानकातून कळंबोली हायवेपर्यंत बसने जातात. तेथून पुढे सहाआसनी रिक्षातून गुदमरून प्रवास करणे किंवा एसटी बसवर अवलंबून राहणे असे दोन पर्याय या प्रवाशांकडे आहेत. हा प्रवास बीईएल नाक्यावर संपतो. तेथून तीनआसनी रिक्षाचालकांचा कायदा सुरू होतो. या रिक्षांमध्ये पाच प्रवासी बसल्याशिवाय येथील रिक्षाचालक प्रवासाला सुरुवात करत नाहीत. या द्राविडी प्राणायामी प्रवासाला एक तास लागतो. तळोजा एमआयडीसी ते खारघर रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू झाल्यास येथील कामगारांना केवळ १५ मिनिटांत व माफक दरांत तळोजा औद्योगिक वसाहतीत जाता येईल.