रबाळे आणि दिघा येथील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे, खिडक्या, नळ चोरीस गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दिवा नाका, पंचशील नगर येथील झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे चोरीस गेले आहेत. काही शौचालयांत दरुगधी पसरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शौचालयांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. आंबेडकरनगर येथील राजर्षी शाहू महाराज शाळेला लागूनच असलेल्या शौचालयाबाहेर राडारोडा टाकण्यात आला आहे. पंचशीलनगर, दिवा नाका येथील नळ चोरीला गेले आहेत. निब्बाण टेकडी येथील शौचालयाबाहेर नागरिक कचरा टाकत असल्यामुळे दरुगधीत आणखीच भर पडत आहे. ऐरोली गाव, साईनाथवाडी, तसेच चिंचपाडा, गणेशनगर, हनुमान मंदिर, जुना चिंचपाडा परिसरात नळ गळके असून स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याची तक्रार येथील महिलांनी केली आहे.

यादवनगर येथील शौचालयांच्या दरवाजांना कडी-कोयंडे नाहीत. दिघ्यातील विष्णुनगर, रामनगर येथील शौचालयांना दरवाजे नाहीत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. तुर्भे, ऐरोलीतील नागरिकांनी सांगितले, की परिसरात ठिकठिकाणी शौचालयांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे; परंतु घरात शौचालय बांधणीसाठी सर्वेक्षण करून अर्ज भरून घेतला आहे; परंतु त्यानंतर अधिकाऱ्यांनी याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, अशी माहिती येथील एका नागरिकाने दिली.

रबाळे परिसरात काही नागरिकांनी घरात शौचालये बांधून घेतली आहेत; परंतु शौच उघडय़ा गटारात सोडला जात आहे. त्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरली आहे.

येथील घाणीमुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे. शौचालयांची अवस्था इतकी वाईट आहे की त्याचा लाभ का घ्यावा, असे कातकरी पाडय़ातील प्रियांका पवार हिने सांगितले.

आंबेडकरनगर परिसरातील दरवाजे, खिडक्या पुढील दोन आठवडय़ांत बसविण्यात येतील. उघडय़ा गटारांत सांडपाण्याच्या वाहिन्या टाकून मैला सोडण्यात येईल. त्याआधी या सर्व प्रकाराची पाहणी करण्यात येईल. – संतोष उनावणे, पालिका कनिष्ठ अभियंता

शौचालयांच्या दुरुस्तीची कामे काही भागांत हाती घेण्यात आलेली आहेत. ज्या भागात समस्या आहेत तेथे समस्यांचे निवारण करण्यात येईल. – अमरीश पटनिगिरे,  परिमंडळ-२ उपायुक्त