जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या समवेत येणाऱ्या लाखो मराठा बांधवांच्या न्याहरी पासून जेवणाच्या व्यवस्थेसाठी वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापारी बांधवांकडून जोरदार तयारी सुरु आहे. बाजार आवारात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच सानपाडा येथील दत्तगुरु देवळातील आवार, वाशी परिसरातील काही मैदानात यासाठी मोठया खानावळ्या तयार करता येतील का याची चाचपणी सुरु असतानाच नवी मुंबईतील घराघरातून या मोर्चानिमीत्त येणाऱ्यांसाठी ‘प्रेमाची चटणी भाकर’ तयार करुन द्या असे आवाहन येथील व्यवस्थेमार्फत केले जात आहे. शहरातील मराठा कुटुंबांनीच नव्हे तर इतर समाजातील नागरिकांनी किमान भाकरी आणि चटणी द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘चटणी भाकर प्रेमाची, आपल्या मुलांच्या भवितव्याची’ अशाप्रकारचे आवाहन घराघरात केले जात असून त्यास वसाहतींमधून अभूतपुर्व प्रतिसाद मिळू लागला आहे.

हेही वाचा >>> घारापुरी बेटावरील स्थानिकांचे व्यवसाय संकटात

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा विराट मोर्चा येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत पोहचेल अशापद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे, लोणावळा या मार्गाने हा मोर्चा शुक्रवारी गव्हाण फाटा मार्गे नवी मुंबईत पोहचेल आणि पुढे तो मुंबईच्या दिशेने रवाना होईल असे सध्याचे नियोजन आहे. जरांगे यांच्यासोबत असलेला मोठा जनसमुदाय पहाता वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी मालाच्या बाजारपेठा उद्यापासून दोन दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. या विस्तीर्ण पसरलेल्या बाजारपेठांमधून या मोर्चेकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असून याशिवाय वाशी, सानपाडा भागातील काही मैदानेही उपयोगात आणता येतील का याचा विचार येथील व्यवस्थापनामार्फत सुरु आहे. नवी मुंबई महापालिका तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या यासंबंधी सातत्याने बैठका सुरु असून २५ तारखेला सायंकाळी अथवा २६ तारखेला सकाळी वाशीच्या शिवाजी चौकात जरांगे यांची एखादी सभा घेता येईल का याचे नियोजनही केले जात आहे. यासंबंधीचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळनंतर स्पष्ट होणार आहे.

चटणी, पिठले, भाकरी, डाळ भात

वाशीतील कृषी बाजारपेठांमध्ये एक दिवस वास्तव्यास असणाऱ्या लाखो मराठा मोर्चेकऱ्यांच्या न्याहरी, जेवणाच्या व्यवस्थेसाठी बाजारांमधील व्यापाऱ्यांनी आपली गोदामे खुली केल्याचे चित्र गुरुवारपासूनच दिसत आहे. या बाजारपेठांमधून वेगवेगळ्या ठिकाणी खानावळ सुरु करुन त्यामध्ये पिठल, चपाती, डाळ, भात असे पदार्थ तयार करण्याचे नियोजन केले जात आहे. याशिवाय येथील मराठा मंडळांनी यानिमीत्ताने समाज बांधवांना केलेले आवाहन लक्षवेधी ठरले आहे. नवी मुंबईतील मराठा समाजातील एका घरामधून किमान एक भाकरी आणि चटणी या मोर्चेकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील वसाहती वसाहतींमधून या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक कुटुंबांनी शुक्रवारी सायंकाळपासून ही व्यवस्था करण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती मराठा मोर्चाचे नवी मुंबईतील व्यवस्था पहाणाऱ्या एका बडया नेत्याने लोकसत्ताला दिली. ‘एक भाकरी प्रेमाची आपल्या मुलांच्या भवितव्याची’ हे आवाहन अनेकांसाठी भावनिक ठरले असून यानिमीत्ताने लाखो भाकऱ्या मोर्चकऱ्यांसाठी उपलब्ध होतील असेही आयोजकांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traders making meal and breakfast arrangement maratha activists in apmc premises zws
First published on: 24-01-2024 at 19:33 IST