नवी मुंबई : सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस सुरू असल्याने नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सकाळच्या सत्रात कोलमडली होती. शहरातील महत्त्वाच्या चारही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. सकाळी मुंबईकडून येणाऱ्या लोकल मात्र धिम्या गतीने धावत होत्या.

रात्रभर प्रचंड पाऊस झाल्याने नेरुळ, सीबीडी उरण फाटा उड्डाणपुलाखाली साचलेल्या गुडघाभर पाण्यामुळे शीव-पनवेल महार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यात भर पडली ती वाशी खाडीपुलावर बंद पडलेल्या ट्रकची. यामुळे सकाळपासून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र होते.

सकाळी सहाच्या सुमारास वाशी खाडीपुलावर एक ट्रक बंद पडल्याने शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडीचा श्रीगणेशा झाला. ट्रक ऐन मध्यावर बंद पडल्याने वाशीकडे येणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अर्ध्या तासाने ट्रक बाजूला काढल्यावर वाहतूक सुरळीत होण्यास एक ते सव्वा तासाचा अवधी लागला. मात्र तोपर्यंत एक किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोकण भवनात प्रचंड पाणी साठल्याने येथील गाडय़ाही बाहेर रस्त्यावर थांबल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. नेरुळ ते सीबीडी येथे दोन्ही बाजूला झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीने १२ अतिरिक्त वाहतूक पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र सकाळी दहाच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यावर पाण्याचा निचरा झाल्याने हळूहळू वाहतूक कोंडी सुटत गेली.

जासई फाटय़ावरून उरण आणि जेएनपीटीकडे जाणारा रस्ता सुरू होतो. तेथे कंटेनर बंद पडल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी अतिरिक्त सहा वाहतूक पोलिसांना पाचारण केल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. महापे- शिळफाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम भर पावसात सुरू असल्याने या मार्गावरही वाहतूक संथ गतीने सुरू होती.

शहरात पावसामुळे वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात झाली होती. उरण फाटय़ावर साचलेले पाणी व त्यातच खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. पावसाचा जोश असेपर्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे.

– सुनील लोखंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग