लोकप्रतिनिधींचा रोष असलेल्या तुकाराम मुंढे यांना देवेंद्र फडणवीस यांचे बळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी येथील राजकीय नेते एकीकडे जंगजंग पछाडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंढे यांना सोबत घेऊन केलेले हवाई उड्डाण येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. सोमवारी एका रुग्णालयाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सोबत घेऊन हेलिकॉप्टरने मुंबई गाठले. मात्र, या प्रवासादरम्यान तसेच त्यानंतर काही तास मुख्यमंत्र्यांसोबत असताना आयुक्तांनी पालिकेतील वस्तुस्थितीचा तसेच अनागोंदीचा पाढाच मुख्यमंत्र्यांसमोर वाचल्याचे समजते.

एका प्रतिथयश रुग्णालयाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. सोमवारी सकाळी नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील संकुलातील हेलीपॅडवर राज्यपाल विद्यासागर राव तर वाशी येथील नवी मुंबई स्पोटर्स असोसिएशनच्या मैदानात मुख्यमंत्र्यांचे हॅलिकॉप्टरने आगमन झाले. शासकीय इतमामानुसार राज्यपालांच्या स्वागतासाठी मुंढे तर मुख्यमंत्र्यांसाठी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. नेरुळ येथील रुग्णालयाचा कार्यक्रम आटोपताच मुंढे वाशी येथे आले आणि पुढे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांनी त्यांच्यासोबत हवाई उड्डाण केले. या उड्डाणादरम्यान महापालिकेतील अनागोंदीचा पाढाच मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे वाचल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. जुहू येथे हॅलिकॉप्टर उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमासाठी सांताक्रुझ येथे निघाले तेव्हाही मुंढे त्यांच्यासोबत गाडीत होते. त्यानंतर मात्र ते नवी मुंबईत परतले असे सुत्रांनी सांगितले. या भेटी दरम्यान मुंढे यांनी नवी मुंबई महपाालिकेतील काही गैरकारभार, वादग्रस्त कंत्राटे, त्यामागे असलेले राजकीय हितसंबंध याची इत्थभूत माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री आणि आयुक्त यांच्यातील या जवळीकीने नवी मुंबईतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या नियोजीत दौऱ्यापूर्वी मुंढे यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर प्रयत्न सोशल मीडियावरून करण्यात आला होता. सोमवारी गुरुनानक जयंतीनिमीत्त सुट्टी असल्याने महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजर राहू नये असा फतवा मुंढे यांनी काढल्याची अफवाही गेल्या आठवडय़ात पसरवण्यात येत होती. परंतु, मुंढे यांनी शनिवारीच, अशा प्रकारचे आदेश काढले नसल्याचे स्पष्ट केले होते. उलट, मुख्यमंत्री शहरात असल्याने सर्व प्रमुख  अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात उपस्थित रहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्त मुंढे यांची बदली करावी, अशी मागणी केली होती.

त्यापूर्वी या नेत्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मुंढे हटाव मोहिमेसाठी शिवसेनेचे नेते कमालिचे सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंबंधी नेमकी कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे. यासंबंधीचा ठराव नगरविकास विभागाने यापूर्वी निलंबित केला असला तरी महिनाभरानंतर तो मागे घ्यावा यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत, असे सांगण्यात येते.

मुख्यमंत्र्यांसोबत मी हेलिकॉप्टरमधून गेलो आणि पुढे सांताक्रुझ येथील एका कार्यक्रमापर्यंत त्यांच्यासोबत होतो, हे खरे आहे; मात्र हा शासकीय कामकाजाचा एक भाग असल्याने या भेटीचा तपशील सांगणे योग्य होणार नाही.  – तुकाराम मुंढे, आयुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tukaram mundhe and cm devendra fadnavis
First published on: 16-11-2016 at 02:33 IST