नवी मुंबई : दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर भूखंडावर येत्या काळात आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या प्रति तिरुपती बालाजी मंदिर उभे राहणार आहे. यासाठी देण्यात येणाऱ्या भूखंडाच्या निर्णयावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे संपूर्ण महामुंबई क्षेत्राचे अर्थचक्र बदलणार असे स्पष्ट दिसून येत आहे.
मागील महिन्यात सिडकोने उलवे सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक तीनच्या वाढीव एक चटई निर्देशांकाने ४० हजार ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड केवळ एक रुपया नाममात्र दराने तिरुपती देवस्थानाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. हा भूखंड मिळवून देण्यात शिवसेनेचे सचिव मििलद नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका असून ते सध्या या देवस्थानाच्या समितीवर विश्वस्त आहेत. देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवस्थानाच्या वतीने हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगळूरु, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र, हृषीकेश या शहरात प्रति तिरुपती बालाजी मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. या देवस्थानाला मुंबईत प्रति व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र मुंबईत मोठी सरकारी भूखंड उपलब्ध नसल्याने महामुंबईत पर्यायी भूखंडाचा शोध घेण्यात आला. त्या वेळी उलवा या सिडकोच्या विकसित नोडमध्ये सुमारे दहा एकरचा हा भूखंड निश्चित करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत तिरुपतीच्या जगप्रसिद्ध व्यंकटेश्वराचे मंदिर उभे राहणार आहे. यामुळे प्रगतिपथावर असलेल्या उलवा नोडचा विकास झपाटय़ाने तर होणार आहेच याशिवाय नवी मुंबईच्या दक्षिण क्षेत्राचे अर्थचक्र बदलण्यास सुरुवात होणार आहे.
याच भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या दोन वर्षांत सुरू होण्याची शक्यता असून गेली पाच वर्षे रखडलेली नेरुळ-उरण रेल्वे सेवा पूर्ण होणार आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीने एसईझेड क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाणिज्यिक व निवासी संकुले उभी राहत असून केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने या भागात विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. जेएनपीटीचा विस्तार सुरू असल्याने हे बंदर देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. त्याच्याजवळ शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू हा मार्ग येत्या दोन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिडको याच भागात एक चाळीस हजार क्षमतेचे स्टेडियमची निर्मिती करीत आहे. त्यामुळे तिरुपती व्यंकटेश्वराच्या मंदिराने या भागाचा सर्वागीण विकास होणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
भाविक आणि पर्यटनाचे केंद्र
हे मंदिर भाविक आणि पर्यटनाचे केंद्रिबदू असणार असून स्थानिकांना रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार आहे. देवस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जात असल्याने त्यांची प्रतिकृतीदेखील या भागात तयार होणार असल्याचा सरकारला विश्वास आहे.