उरण चारफाटा रस्ता रुंदीकरण; नागरिकांना दिलासा

शहरातील मुख्य मार्ग असलेल्या चारफाटा येथील रस्ता नादुरुस्त झाल्याने उरणमधील नागरिकांसह वाहनचालकांना धुळ,खड्डे तसेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

loksatta
प्रतिनिधीक छायाचित्र

उरण : शहरातील मुख्य मार्ग असलेल्या चारफाटा येथील रस्ता नादुरुस्त झाल्याने उरणमधील नागरिकांसह वाहनचालकांना धुळ,खड्डे तसेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. याची दखल घेत सिडकोकडून चारफाटा येथील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या कामानंतर पावसाळय़ात अडथळेमुक्त प्रवास करता येणार असल्याने दिलासा मिळणार आहे. उरण शहरात प्रवेश करीत असताना ओएनजीसी, करंजा आदी भागांना जोडणाऱ्या चारफाटय़ावर मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यात धूळ साचून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांनीही रस्त्यातच व्यवसाय थाटल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास होत आहे.
सिडकोच्या माध्यमातून या चौकाचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव मागील पाच वषार्पासून आहे. त्यासाठी येथील अनधिकृत झोपडपट्टीवरही कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी रस्ता रुंदीकरण व चारफाटय़ाच्या सुशोभीकरणाला सुरुवात झालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. या रस्त्याचे काम रखडलेल्याने दररोज सायंकाळी व सुट्टीच्या दिवशी नागिरकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
अखेरीस मंगळवारपासून उरण चारफाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सिडकोकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे उरणमधील ओएनजीसी, करंजा तसेच शहरात ये जा करणाऱ्या प्रवासी व नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे मत करंजा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uran charphata road widening consolation citizens cidco amy

Next Story
सतरा प्लाझाला भिंतीचे कुंपण कधी?; पामबीच मार्गावरून बेकायदा प्रवेश बंदीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी