पावसात मालधक्का परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर; रहिवाशांच्या आरोग्याला धोका

सीमा भोईर, पनवेल</strong>

पनवेल रेल्वे स्थानकाकडे मालधक्का परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर मुसळधार पावसात दुर्गंधीयुक्त पाणी तुंबले होते. हे पाणी ओसरल्यानंतर येथील परिसरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मालधक्का परिसरातील रस्त्याच्या एका बाजूला पक्की घरे आहेत. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. या साऱ्या झोपडय़ा बेकायदा आहेत, असा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे येथे काही वर्षांपासून आवश्यक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. झोपडपट्टीमधून येणारे सांडपाणी नाल्यातून थेट रस्त्यावर येते. त्याचा त्रास मालधक्का परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे.

पावसाळ्याआधी येथील नाल्याची सफाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यात मुसळधार पावसात पाणी साचून राहिले. कुजलेल्या सांडपाण्याची असह्य़ दुर्गंधी स्थानक परिसरात पसरलेली होती, अशी तक्रार नागरिकांनी केली. येथील नाला अरुंद आहे. त्यातील पाणी एकाच जागी साठून राहते. पावसाळ्यात तर येथे परिस्थिती अधिकच दयनीय होते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मालधक्का परिसरातील पक्क्या घरांतील नागरिकांनी सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार केली आहे. मात्र पालिकेने यावर कोणताही उपाय केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. डासांची संख्या वाढल्याने मलेरियाच्या साथीची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. सांडपाण्यामुळे काविळीच्या साथीचाही धोका आहे. येथील खासगी रुग्णालयांमध्ये मलेरिया आणि काविळीचे रुग्ण आढळून येत आहेत.

येथील नाला आणि गटारांवर झाकणे लावल्यास साथीच्या रोगांचा धोका उद्भवणार नाही, त्यामुळे पालिकेने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मालधक्का परिसरातील झोपडय़ा बेकायदा असल्याचा दावा सरकारी अधिकारी करीत असतील तर राजकीय नेते निवडणुकांच्या काळात आमच्या दारी मतांसाठी का येत आहेत, असा प्रश्न झोपडपट्टीतील नागरिकांनी केला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून परिसरात सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. परंतु आजवर एकही सुविधा आमच्या पदरात पडलेली नाही, असे येथील रहिवाशांनी म्हटले आहे.

उघडा नाला लवकरच बंदिस्त केला जाईल. त्यासाठी पक्के बांधकाम केले जाईल. या संदर्भात बांधकाम विभागाला तशा सूचना केल्या जातील, असे पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक संगीता आंबोलकर यांनी सांगितले.

खिशातून खर्च!

नाल्याचे पाणी वाढले की ते रस्त्यावर येते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच दयनीय होते. याविषयी पालिकेत अनेकदा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. मी स्वत:च पैसे खर्च करून रस्त्यावर खडी टाकत असल्याचे मालधक् का येथील रहिवासी बशीर कुरेशी यांनी सांगितले.

सरकारी अनास्था

मालधक्का परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वस्ती आहे. यातील झोपडपट्टीचा भाग हा बेकायदा असल्याचा दावा सरकारी अधिकारी करीत आहेत.