पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप; स्वयंचलित पंप बंद असल्याचा परिणाम

कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महापे भुयारी मार्गाची पहिल्याच पावसात दैना झाली. भुयारी मार्गात मोठय़ा प्रमाणात पाणी साठल्याने वाहनचालकांना मनस्ताप भोगावा लागला. साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या स्वयंचलित पंपातील महागडी बॅटरी चोरीला जाऊ नये म्हणून ती काढून ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोटार सुरू न झाल्याने साठलेल्या पाण्याचा निचरा न होता ते भुयारी मार्गातच साचून राहिले.

ठाणे, उरण, नाशिक, जेएनपीटी, मीरा-भाईंदर या मार्गासाठी वरदान असलेल्या ठाणे-बेलापूर महामार्गावर भविष्यातील वाहतुकीचा विचार करून कोटय़वधी रुपये खर्चाचे उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. घणसोली उड्डाणपूल, कळवा आणि सविता केमिकल्स उड्डाणपुलासह अन्य दोन नियोजित प्रकल्पांचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

नैसर्गिकरित्या पाण्याचा निचरा लवकर झाला नाही तर कृत्रिम पद्धतीने निचरा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने या ठिकाणी तीन स्वयंचलित पाणी उपसा पंप बसवले आहेत. पाणी ठरावीक उंचीवर आले की हे पंप आपोआप सुरू होतील अशी व्यवस्था आहे. मात्र या पंपांतील बॅटरीची चोरी होऊ नये म्हणून या बॅटऱ्या काढून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शनिवारी झालेल्या पहिल्या पावसात पाणी साठल्यानंतरही पाणी उपसा पंप सुरू न झाल्याने भुयारी मार्गात पाणी तुंबले. अखेर तंत्रज्ञ पाठवून ते पंप सुरू करण्यात आले. त्या अनुभवातून धडा शिकून स्वयंचलित पंपाच्या बॅटऱ्या न काढता तशाच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या पंपाच्या पाइपवर प्लास्टिकअडकून पंप गरम झाल्याने बंद पडल्याचे कारण या वेळी सांगण्यात आले.

पावसाळ्याला अद्यापही खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नसतानाही दोन वेळा पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. त्यामुळे आता यापुढे पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची खबरदारी प्राधिकरणाने घ्यावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बॅटरीची चोरी होऊ नये म्हणून ती काढून ठेवण्यात आल्याने ही गडबड झाली. पहिलाच अनुभव असल्याने असे झाले. आता या पुढे तसे होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. या ठिकाणी कायमस्वरूपी तंत्रज्ञांची नेमणूक करण्याचाही विचार आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.   –दिलीप कवठकर, प्रकल्प सहसंचालक, एमएमआरडीए