|| पूनम धनावडे

भाजीच्या मळ्यांसाठी कोपरखैरणे, तुर्भे दरम्यानचा धोकादायक प्रकार

रेल्वेच्या मोकळ्या जागेत सांडपाण्यावर पिकवलेल्या भाज्यांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना आता हे सांडपाणी पुरविण्यासाठी चक्क रेल्वे रुळांखालून छोटी जलवाहिनी टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे व तुर्भे दरम्यान सुरू असून रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.

तुर्भे ते कोपरखैरणे स्थानकादरम्यान सेक्टर २६, रेल्वे वसाहतीजवळ चार ते पाच ठिकाणी आशा जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांलगतच्या मोकळ्या जागेत अनेक ठिकाणी भाजीचे मळे फुलवले जात आहेत. मात्र यासाठी सांडपाण्याचा वापर केला जातो. तुर्भे ते कोपरखैरणे स्थानकांदरम्यानही रेल्वे वसाहतीजवळ दोन ते तीन एकरांत भाजी पिकवली जाते. मात्र यासाठी पाणी येथे उपलब्ध नाही. त्यामुळे एमआयडीसीतील कंपन्यांमधून सोडलेले सांडपाणी वापरले जाते. धक्कादायक म्हणजे हे पाणी वाहून नेण्यासाठी चार ते पाच ठिकाणी छोटी जलवाहिनी रेल्वे रुळांखालून टाकलेली आहे. ती खड्डे खणून न टाकता वरचेवर टाकली असून यामुळे रुळाला धोका संभवतो. यामुळे अपघात झाला तर जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशी करीत आहेत. बाबत माहिती घेऊन विनापरवानगी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे  रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दूषित पाण्यावर

भाजीचे मळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे, मात्र या प्रकाराने रेल्वे प्रवाशांचा जीव देखील धोक्यात टाकण्यात आला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे प्रशासन दर आठवडय़ात रेल्वे रुळाच्या दरुस्ती करीत असते, त्यावेळी हा प्रकार दिसत नाही का? असाही सवाल प्रवासी करीत आहे.