|| सीमा भोईर

पनवेलमध्ये पाणीपुरवठय़ासाठी गतवर्षी ८००, तर यंदा १६०० रुपये

पावसाळा सुरू झाला तरी पनवेल शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यामुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. टँकरचालकांनीही याचा फायदा घेत टँकरच्या किमती वाढवल्या असून त्या दुप्पट करण्यात आल्या आहेत. गतवर्षी एका टँकरसाठी ८०० रुपये मोजावे लागत होते. आता हेच दर १६०० रुपये करण्यात आले आहेत. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागांत टँकरचा काळाबाजारही सुरू आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे, तर टँकरचे दर गतवर्षी १५०० रुपये होते आता त्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, असे टँकर कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात पनवेल शहरातील धरणांमधील पाण्याचा साठा लक्षात घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाणी नसल्याच्या अनेक तक्रारी नगरसेवकांकडे येत आहेत. पालिकेच्या तसेच खासगी टँकरचीही मागणी वाढली आहे. महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी अशा दोन प्रकारे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सात टँकरधारकांना पालिकेने ठेकेदारी पद्धतीने सेवा पुरविण्याचे काम दिले आहे. खासगी टँकरचालक दहा ते पंधरा हजार लिटरसाठी अंतरानुसार १६०० ते २००० रुपये घेत आहेत. त्याबरोबरच टँकरच्या फेऱ्यांसंबंधीच्या नेमक्या नोंदी महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवर केल्या जात नाहीत, अशाही तक्रारी आहेत. या नोंदींमध्येच मोठा फेरबदल करून टँकरचालक काळाबाजार करत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा काळाबाजार रोखण्याची मागणीही करण्यात येत आहे, मात्र अद्याप प्रभावी उपाययोजना झालेली नाही. या टँकरद्वारे प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांना आणि मोठय़ा गृहसंकुलांना पाणीपुरवठा केला जातो, पनवेलमधील नागरिकांचे म्हणणे आहे.

एप्रिल महिन्यापासून पनवेलमध्ये अध्र्याहून अधिक सोसायटय़ांना टँकरच्या पाण्याची गरज भासत आहे. यावेळी दर दुप्पट झाले आहेत. पाणी नसल्यामुळे प्रचंड गैरसोय होते, त्यामुळे दर दुप्पट होऊनही आम्ही टँकरचे पाणी घेत आहोत, अशी व्यथा दीक्षा पाटील यांनी मांडली.

गेल्या वर्षी टँकरची किंमत ८०० रुपये होती, यंदा ती दुप्पट झाली आहे. अनियमित पाणीपुरवठा, टँकरची भाववाढ, पालिकेचे सातत्याने होणारे दुर्लक्ष यामुळे पनवेलमध्ये राहायचे तरी कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.   – आनंद पाटील, रहिवासी, पनवेल

गेल्या वर्षी प्रति टँकर १५०० रुपये आकारले जात होते. यंदा १०० रुपये वाढवून दर १६०० रुपये करण्यात आला आहे. आमच्याकडे पिण्याचे पाणी असल्याने जास्त दर आकारला जात आहे. – डिंगोरकर ट्रान्सपोर्ट, टँकर पाणी पुरवठादार

ठेकेदाराकरवी पनवेल शहरात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महानगरपालिका टँकरचालकांना मोफत पाणी पुरवते. टँकरच्या खर्चाव्यतिरिक्त काही अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल, तर आम्हाला कल्पना नाही.   – आर. आर. तायडे, पाणीपुरवठा अभियंता, पनवेल महानगरपालिका