मृत ११ खारी, १ कासव हस्तगत; शिकाऱ्यांची समज देऊन सुटका

उरण तालुक्यातील चिरनेर तसेच जंगल परिसरात प्राण्या-पक्ष्यांची शिकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. चिरनेर येथे वन्यजीव संरक्षकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गुरुवारी ही घटना उघडकीस आणली. यावेळी शिकाऱ्यांकडून त्यांनी मारलेल्या ११ खारी आणि एक कासव हस्तगत करण्यात आले.

चिरनेर जंगलात बेचकी, कोयता, विळा यांच्या सहाय्याने प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती चिरनेरमधील वन्यजीव संरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट जंगल गाठले. त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी येण्याची विनंती केली. जंगलात पोहचताच चार शिकारी हातात प्राणी घेऊन पळत असल्याचे त्यांना आढळले. वन्यजीव संरक्षकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चौघांपैकी एका शिकाऱ्याला पकडण्यात त्यांना यश आले. विवेक केणी आणि आनंद मढवी यांच्या सहकाऱ्यांनी या शिकाऱ्यांना पकडण्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. या शिकाऱ्याकडे ११ खारी आढळल्या. वनविभागाचे अधिकारी आर. डी. राऊत यांनी या मृत प्राण्यांचे दहन केले.