अभ्यासक्रमाची जबाबदारी क्रीडा शिक्षकांवर; वैद्यकीय शिक्षण विभागाची माहिती

राज्यातील शाळांमध्ये लवकरच योगाआधारित अभ्यासक्रम सुरू होणार आहे. सध्या शासकीय शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून, सरकार याबाबत विचारविनिमय करत आहे. अभ्यासक्रमाची जबाबदारी क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार आहे. याबाबतचे र्सवकष धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाने वाशी येथे सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र शासन शिक्षण संस्थांमध्ये योगाभ्यास सुरू करण्यासाठी र्सवकष धोरण आखत आहे. योगाभ्यास कसा करावा, कोणत्या वयोगटातील मुलांचा यामध्ये समावेश करावा, याचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रात यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शासकीय शिक्षण संस्थांची निवड केली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रांतील अधिकाऱ्यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शासकीय शिक्षण संस्थांमध्ये योगाभ्यास वर्ग यशस्वी ठरल्यानंतर खासगी शाळांना देखील यासाठी आग्रह केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २१ जूनला देशभर योगदिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी यंदा नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आयुष संचालनालयाने या योगदिनाचे आयोजन केले आहे.

योगदिनी मान्यवरांची मांदियाळी

कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील सर्वच मुख्यालयांमध्ये योग दिन साजरा केला जाणार आहे. ४ हजार डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, केंद्रीय औद्योगिक दलाचे १ हजार जवान, ५ हजारांपेक्षा अधिक योगपटू आणि विविध सामाजिक संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. समर्थ व्यायामशाळेचे हे खेळाडू आहेत. योगाभ्यासातील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. आरोग्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, सचिन धर्माधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील.