पनवेल ग्रामीणमधील स्थिती दिलासादायक

पनवेल : पनवेल शहरात करोनाचे रुग्ण सापडत असले तरी ग्रामीण पनवेलमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली असून गेल्या आठ दिवसांत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असे असले तरी ग्रामस्थांनी सामाजिक अंतर पाळणे, मुखपट्टी लावणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गेल्या दीड वर्षांत ग्रामीण पनवेलमधील १९,८५४ जणांना करोनाची बाधा झाली असून यापैकी २९८ जणांचा मृत्यू झाल्याची संख्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. मात्र गेल्या आठवडय़ाभरापासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गावागावांत सुरू असल्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच मृत्यूदर शून्यावर स्थिरावताना दिसत आहे. १९ ऑगस्टला एका ग्रामस्थाचा मृत्यू वगळता गेल्या आठवडय़ाभरात एकही मृत्यू करोना संसर्गामुळे झाला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.पनवेल ग़्रामीणमध्ये ४३,१६४ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ३१,८०९ जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या कमी होणे हे दिलासा देणारी बाब असली तरी ग्रामस्थांनी करोना नियंत्रणासाठीची सरकारने सुचविलेली त्रिसूत्री विसरून चालणार नाही. तालुक्यातील सहा विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामस्थांचा लसीकरणालाठी प्रतिसाद उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नखाते यांनी सांगितले.

उरणमध्येही मृत्युदर शून्यावर

पनवेलप्रमाणे उरण तालुक्यातील करोना संसर्ग लवकरच पूर्णपणे नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आरोग्य विभागाला आहे. उरण तालुक्यात रुग्ण मृत्यूचा दर अनेक दिवस शून्यावर आहेच, मात्र दिवसातून रुग्ण सापडणेही बंद झाले आहे. सध्या ४० रुग्ण उरणमध्ये उपचार घेत आहे.