पाणीटंचाई, सागरी सुरक्षा, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न
जिल्हा परिषदेचा चाणजे मतदारसंघ खाडी किनाऱ्यावर वसलेल्या नागरी वस्तीचा आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व २०१२ मध्ये भाजपाकडे गेले. असे असले तरी करंजा, डाऊर नगर व केगाव येथील पाणीटंचाई, तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे. तर नौदलाचे सुरक्षा क्षेत्र आणि सिडकोच्या अनधिकृत बांधकामांमुळे हजारो स्थानिकांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इतरही अनेक नागरी समस्या या मतदारसंघात आहेत. यावेळी दुसऱ्यांदा हा मतदार संघ महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे भाजप आपली जागा राखणार की शेकाप काँग्रेस आघाडी किंवा शिवसेना बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
करंजा येथील सात पाडय़ांमुळे येथे कोळी समाजाचे वर्चस्व आहे. मच्छीमारांच्या समस्या अनेक आहेत. याच मतदार संघातून निवडून येऊन रमेश डाऊर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. येथील मुळेखंड, तेलीपाडा, चाणजे, करंजा त्याच प्रमाणे नागाव, केगाव, म्हातवली या ग्रामपंचायतीत सिडकोने आरक्षण लादले आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या नसल्या तरी त्यांना आपल्या जमिनींवर विकास करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडून येथील बांधकामांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यातील काहींवर दोन महिन्यांपूर्वी कारवाईही करण्यात आली आहे. परंतु उरण शहरात स्वस्त घर नसल्याने शेजारील ग्रामपंचायतीत उभ्या राहणाऱ्या इमारतींकडे येथील रहिवासी वळले आहेत. अशा प्रकारच्या बांधकामांची संख्या वाढू लागली आहे. यातील नागरिकांवरही सिडकोच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. तर डाऊर नगर ही वसाहत महसूल विभागाच्या जमिनीवर वसलेली आहे. त्यांनाही बांधकामांचे दंड आकारून ती हटविण्याच्या नोटिसा महसूल विभागाने दिल्या आहेत. सागरी किनाऱ्यावर ही सर्व गावे वसलेली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न आहे. अनेक वर्षे करंजा येथील पाडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहेत. सिडकोकडून या पाडय़ांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असली तरीही प्रश्न कायम आहे. तर केगाव परिसरातही पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे.
मतदारसंख्या व रचना
चाणजे मतदारसंघाची लोकसंख्या २३ हजार ९४० इतकी आहे. यात १२ हजार ३८ पुरुष व ११ हजार ९०२ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली चाणजे ग्रामपंचायत, करंजा, डाऊर नगर, नागाव ग्रामपंचायत, म्हातवली तसेच केगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
