सतराव्या शतकात मुंबई ही केवळ बॉम्बे, कुलाबा, ओल्ड वूमन आयलंड, माहीम, माझगांव, परळ आणि वरळी या सात मुख्य बेटांनी बनलेली होती. इ.स. १६६५ मध्ये पोर्तुगीजांकडून ही बेटे ब्रिटिशांच्या हाती आल्यानंतर त्यांना मोक्याची (स्ट्रॅटेजिक) ठिकाणे बनविण्याचे ठरवले गेले; परंतु या बेटांचे एकूण क्षेत्रफळ त्यासाठी फारच तुटपुंजे होते. त्यामुळे त्या वेळच्या बॉम्बेच्या गव्हर्नरने (विल्यम हॉर्नबी) ही बेटे जोडण्याचे ठरवले. बेटांमधील उथळ पाण्यात भराव टाकून जमिनीचे पुन:प्रापण (रेक्लमेशन) करायचे आणि उधाणामुळे सखल भागात येणारे पाणी रोखण्यासाठी समुद्रात बांध घालायचा, अशी ढोबळ योजना होती. प्रत्यक्षात मात्र अरबी समुद्राच्या खवळत्या पाण्यात बांध टिकतच नव्हते. कालांतराने सन १८९० पर्यंत सर्व बेटे जोडली गेली.

स्वातंत्र्यपूर्व काळातील जमीन पुन:प्रापण स्वातंत्र्यानंतरही विविध कारणांसाठी कायदेशीर व बेकायदा मार्गानीही सुरूच राहिले. किंबहुना १९७० ते २०१२ पर्यंत या पुन:प्रापणाचा वेग सर्वाधिक राहिला. यामुळे विविध प्रकारच्या समस्या उभ्या राहिल्या. या प्रदेशातले मूळ रहिवासी असलेल्या मासेमार व शेतकरी समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले तर गेलेच, पण त्यांच्या वस्त्यांवरही गदा आली. उथळ पाण्यातील अतिशय समृद्ध परिसंस्थांचा नाश झाला. तेथे होणारी सागरी जीवांची पैदास थांबली आणि तटीय जैवविविधता रोडावली. भातशेती, मिठागरे आणि त्यांना आनुषंगिक उद्योगही लयाला गेले. मुंबईच्या मूळ रहिवाशांची मिळकत कमी झाल्याने ते तेथून परागंदा झाले.

भरती-ओहोटी, लाटांचा मारा, प्रवाह अशा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामी किनारपट्टीचे स्वरूप ठरते; पण भराव टाकल्याने त्यांचा परिणाम कोठे व कसा होईल, याचा अंदाज प्रयोगात्मक भरावाद्वारे घेतला न गेल्याने इतर ठिकाणच्या किनारपट्टय़ांची झीज होऊन गाळ समुद्रात वेगवेगळ्या स्थानी साठून अकल्पित प्रवाह वा बलशाली लाटांचा त्रास होतो. आजवर झालेले सागरी जमीन पुन:प्रापण घाईने आणि विस्कळीत स्वरूपात झालेले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे दीर्घकालीन नुकसान झाले आहे. लोकमताचा रेटा, तज्ज्ञांनी वेळोवेळी दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने  विचार करून वैज्ञानिक पद्धतीने आणि अत्यावश्यक असल्यासच पुन:प्रापण प्रकल्प हाती घेतले जावेत.

डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org