सुनीत पोतनीस

गेल्या शतकात उदय झालेल्या आशियाई देशांपैकी बहुचर्चित उत्तर कोरिया हा एक. मूळच्या कोरियाची फाळणी होऊन त्याचे दोन तुकडे झाले : उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. या संदर्भातल्या राजकीय उलथापालथीविषयी मागील लेखांकांमध्ये लिहिले आहेच. अलीकडे उत्तर कोरिया चर्चेत आहे तो या देशाचा हुकूमशहा अध्यक्ष किम जोंग-उन याच्या दडपशाही आणि विक्षिप्त कारभारामुळे, विशेषत: अमेरिकेला त्याने दिलेल्या आव्हानामुळे!

दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर- तोवर जपानच्या ताब्यात असलेला कोरिया- १९४५ साली महायुद्धातील जेत्या राष्ट्रांपैकी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांनी फाळणी करून वाटून घेतला. त्यातील उत्तर कोरियावर रशियाने अंमल बसवला. या उत्तर कोरियाची सरहद्द उत्तरेत रशिया आणि चीनला भिडलेली आहे. कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाच्या हातात उत्तर कोरियाची सत्ता आल्यावर त्यांनी तिथे ‘सोश्ॉलिस्ट डेमोकॅट्रिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’चे साम्यवादी विचारप्रणालीचे सरकार स्थापन केले. प्याँगयांग हे उत्तर कोरियाच्या राजधानीचे शहर.

उत्तर कोरियाच्या सरकारने १९४६ मध्ये अस्थायी ‘पीपल्स कमिटी’ स्थापन करून तिच्या अध्यक्षपदी किम इल-सोंग यांची नियुक्ती केली. पुढे १९४८ मध्ये रशियाने ‘डेमोकॅट्रिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’च्या स्थापनेची अधिकृत घोषणा करून किम इल-सोंग यांना या सरकारचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधानपदी बसवले. किम इल-सोंग हे १९४८ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९४ पर्यंत उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेता बनून राहिले. पंतप्रधानपदी १९४८ ते १९७२ व पुढे राष्ट्राध्यक्ष पदावर १९७२ पासून १९९४ पर्यंत.

९ सप्टेंबर १९४८ रोजी राजधानी प्याँगयांग येथे उत्तर कोरियाचे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ सरकार स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि तोच दिवस त्या देशाचा स्वातंत्र्य दिन समजण्यात येतो. त्याच वर्षी सोव्हिएत रशियाची फौज उत्तर कोरियातून परत गेली. सुरुवातीला रशिया आणि चीनच्या मदतीने कारभार हाकणाऱ्या किम इल-सोंग यांच्या सरकारने पुढे ‘जुचे’ म्हणजे आत्मनिर्भरतेची आचारसंहिता पाळून कारभार केला. त्यासाठी देशातले सर्व मोठय़ा उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करून शेतीचे सामूहिकीकरण केले. किम इल-सोंग यांचे सरकार साम्यवादी प्रणालीकडे झुकलेले आणि बरेचसे हुकूमशाही पद्धतीचे होते.

sunitpotnis94@gmail.com