जैवविविधता फक्त दूर खेडय़ांत, दऱ्याखोऱ्यांत अथवा घनदाट अशा जंगलांमध्येच आढळते, असा सर्वसाधारण समज आहे. पण जैवविविधता शहरांत कशी निर्माण करता येईल? अगदी सोपा उपाय आहे- शहरात जिथे जिथे मोकळ्या जागा दिसतील तिथे तिथे जैवविविधता उद्याने निर्माण केली, की आपोआप पक्षी किलबिल करू लागतील, फुलपाखरे भिरभिरू लागतील! आजूबाजूला अशी फुलापानांनी बहरून आलेली थोडी जरी झाडेझुडपे असतील, तर किती तरी पक्षी अगदी आनंदाने तुमच्या जवळपास घरटी बांधतील, मधमाश्या पोळं करतील!

जागतिक बँकेच्या २०१८ सालच्या एका अहवालानुसार, भारतात एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के लोक वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात वस्ती करतात. त्यामुळे शहरांची रचना करताना, नागरिकांना आरोग्यविषयक आणि इतर मूलभूत सोयी पुरवताना निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन यांकडेही लक्ष दिले पाहिजे. मुंबई- नवी मुंबई- ठाणे- पुणे- नाशिक- नागपूरसारख्या नागरी/शहरी भागांत हिरवीगार उद्याने अत्यावश्यक आहेत, ती केवळ सौंदर्यदृष्टय़ा नव्हे तर शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी. त्याद्वारे मिळणारी विनामूल्य शुद्ध हवा आणि आल्हाददायी गारवा या आरोग्यदायक सेवांमुळे अशी उद्याने म्हणजे शहराची फुप्फुसेच ठरतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, यामुळे आबालवृद्धांना निसर्गाच्या समीप आणता येईल. शहरातील धकाधकीच्या दैनंदिन जीवनात निसर्गाशी एकरूप होणे, हा मन आनंदी ठेवण्याचा एक मंत्र आहे. त्यासाठी उद्यानांच्या लहान-मोठय़ा जागा शहरांत हव्याच.

Valsad in the south, the tribal region in Gujarat
नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?
It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार

संशोधकांना, अभ्यासकांना आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान, कला, सामाजिक क्षेत्रातील अनुभवाधारित शिक्षण घेण्यासाठी बिनभिंतींची आणि खुली निसर्ग-प्रयोगशाळा म्हणून जैवविविधता उद्याने विकसित करता येतील. नानाविध प्रकारच्या वनस्पती, कीटक व अन्य प्राणी, जमिनीतील सजीव सृष्टी यांचा परिचय त्याद्वारे होऊ शकेल. त्यांच्या आकार, रंग, गंध, स्पर्श आणि सौंदर्य यांतील विविधता अनुभवताना प्रत्यक्ष आकलनाबरोबरच सभोवतालच्या स्थितीशी जुळवून घेताना त्यांत झालेले सूक्ष्म बदल, सहकार्य, स्पर्धा, तडजोड, परस्परावलंबन अशी महत्त्वाची जीवनकौशल्ये मुले सहज शिकतील.

जैवविविधता उद्याने एखाद्या प्रकल्पाच्या स्वरूपात कार्यान्वित करताना उद्योजकता आणि सर्जनशीलतेचा सुरेख मेळही साधता येईल. होतकरू आणि निसर्गप्रेमी तरुणांना यात अशी उद्याने उभारण्यास लागणारी शास्त्रीय माहिती देणारे सल्लागार वा आयोजक म्हणून किंवा रोपवाटिकेद्वारे उपजीविकेचे साधन आणि समाधान मिळू शकते.

– डॉ. सुगंधा शेटय़े

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई</strong> २२ office@mavipamumbai.org