आपण खूप सहजपणे बोलतो, सतत भाषा वापरत असतो. त्यावेळेला नकळत मेंदूत अनेक घडामोडी घडत असतात. विविध अवयवांमध्ये देवाणघेवाण चालू असते. आणि त्यातूनच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं.

ज्यांच्या मेंदूला काही प्रकारची इजा झालेली आहे, ज्यामुळे त्यांच्या भाषेवर परिणाम झाला आहे, अशांच्या मेंदूवर संशोधन करून युनिव्हर्सटिी ऑफ आयोवातील कॉलेज ऑफ मेडिसीनचे डॉ. अंतानियो दमशिओ यांनी काही निष्कर्ष काढले आहेत.

मेंदूच्या डाव्या अर्धगोलामध्ये भाषा निर्मिती कशी होते याचे नकाशे त्यांनी दिले आहेत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा विविध भागांमध्ये हे काम चालतं.

(१) काय बोलायचं आहे याचं आकलन असणं. (२) कोणते शब्द हवे आहेत याचा विचार करून शब्द शोधणं, (३) त्यानुसार स्वरयंत्रातून योग्य ते ध्वनी निघणं, (४) त्याच्यातून काही अर्थपूर्ण शब्द तयार होणं. (५) क्रियापदं शोधणं, (६) योग्य व्याकरण वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार होणं – साधारणपणे अशा कृतींतून एक वाक्य आकाराला येतं. या कृतींसाठी डाव्या अर्धगोलातलं एक मोठं क्षेत्र काम करत असतं.

दमशिओ यांच्या म्हणण्यानुसार मूक व्यक्ती साईन लँग्वेजचा वापर करून बोलते. त्यावेळेला प्रत्यक्ष ध्वनींचं साहाय्य फारसं होत नसलं, तरी काय बोलायचं आहे हे पक्कं माहीत असतं. त्यामुळे हीच भाषाक्षेत्रं वापरली जातात.

या संशोधनाचा वापर अन्य भाषा शिकताना करता येऊ शकतो. त्यानुसार प्रत्येक बारीकसारीक तुकडय़ांकडे लक्ष दिलं तर नव्या भाषेचं आकलन आणि त्यातला ओघवतेपणा वाढवता येऊ शकेल.

याच संशोधनानुसार असंही म्हणता येतं की, ज्यावेळेला माणसं रागाच्या- अतीव संतापाच्या भरात अद्वातद्वा बोलत असतात त्यावेळी बोलण्याची सगळी क्षेत्रं चालू असतात. पण काय बोलावं, कसं बोलावं, आपण नको ते बोलतो आहोत, या गोष्टी बोलल्या नाही तर चालतील यावरचं आकलनाच्या क्षेत्रातलं नियंत्रण काही प्रमाणात सुटतं. कारण संताप या भावनेने या क्षेत्रांचा ताबा घेतलेला असतो. मेंदूने भावनांकडे रक्तप्रवाह सुरू केलेला असतो, त्यामुळे बोलल्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. यामुळे आकलनाच्या क्षेत्रावर नियंत्रण असलं पाहिजे. आपला मुद्दा शांतपणे पोहोचवणं यासाठी कौशल्य असावं लागतं किंवा ते कमवावं लागतं.

contact@shrutipanse.co