भारतातील बरीचशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने कोरडवाहू जमिनीत कोणती पिके काढता येतील यावरील संशोधनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आंध्र प्रदेशच्या पतनचेरू भागात इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी एरिड ट्रॉपिक्स) नावाची संस्था संशोधन करत असून तिथे उपमहासंचालक या पदावर डॉ. य. ल. नेने काम करीत होते.
ग्वाल्हेर येथे जन्मलेले डॉ. यशवंत लक्ष्मण नेने यांचे शिक्षण ग्वाल्हेर, कानपूर व अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात झाले. वानस विकृती विज्ञान व विषाणू विज्ञान हे त्यांचे विषय. उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील कृषी विद्यापीठात १४ वष्रे प्राध्यापकी केल्यानंतर ते २२ वष्रे पतनचेरूला होते. डाळीच्या पिकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी येथे त्यांच्याकडे होती.
जस्त या अन्नद्रव्यावरील संशोधनाची सुरुवात प्रथमच करून तांदळावरील खैरा रोग जस्ताच्या कमतरतेमुळे होतो हे त्यांनी सिद्ध केले. गव्हावरील रोगांवरही त्यांनी विशेष काम केले. त्या काळात डॉ. नेने व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्लान या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जातीचा विकास केला. याकरिता डाळीचे सुधारित बियाणे त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यामुळे हेक्टरी तिप्पट उत्पादन मिळू लागले. याकरिता कमी उंचीच्या जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून एकाच झाडापासून वर्षांत दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली. परिणामी, हेक्टरी ६०० ऐवजी २००० किलोग्रॅम पीक घेता आले. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनेक देशी-विदेशी कृषी परिषदांच्या संयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निवृत्तीनंतर ते एशियन अॅग्रि-हिस्टरी फाऊंडेशन या त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेचे काम पूर्णवेळ पाहू लागले. आग्नेय आशियात कृषिउत्पन्नाची समृद्धी असल्यामुळे येथील शेतीविषयक जे काही जुने वाङ्मय असेल ते मिळवून इंग्रजी, हिंदी, मराठीत त्यांनी छापायचे ठरवले. त्याप्रमाणे आतापर्यंत वृक्षायुर्वेद, कृषिशासनम्, कृषिपराशर, लोकोपकार वगरे पुस्तके तयार झाली. संस्थेद्वारे एक त्रमासिकही त्यांनी सुरू केले.
– अ. पां. देशपांडे     
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:    रक्ताचा रक्तरंजित इतिहास
रक्ताचे दान करणे आणि ते रुग्णाच्या शरीरासाठी वापरणे हे वाटते तेवढे कधीच सोपे नव्हते आणि आता तर त्यासाठी काटेकोर कायदे करण्यात आले आहेत. १९८५ साली मी लुइव्हिल या केंटकी नावाच्या अमेरिकेतल्या प्रांतात एक सुप्रसिद्ध रुग्णालयात सन्माननीय व्याख्याता होतो. माझे दुर्दैव असे की, एक शस्त्रक्रिया करताना माझ्याच हाताला जखम झाली. जखम लगेचच भरली; परंतु बरोबर तीन महिन्यांनी मला एक फार वाईट कावीळ झाली. मी परत आल्यावर आठवडय़ातच दुसऱ्या काही कारणासाठी रक्त तपासले होते. त्यात वापरल्या गेलेल्या सुईमुळे किंवा या जखमेमुळे मला ही कावीळ झाली होती. संसर्गजन्य रोगासाठी रक्तसंबंधासारखा दुसरा राजमार्ग नाही हे त्या काळात लक्षातच आले नव्हते. माझा एक मित्र २० वर्षांचा असताना आजारी होता. त्याला सलाइन द्यावे लागले होते. त्या सलाइनच्या नीट र्निजतुकरण न केलेल्या सुईमुळे ५० वर्षांपूर्वी त्याला अशीच कावीळ झाली. त्यातून तो वाचला, पण त्या काविळीच्या व्हायरसने त्यांच्या यकृतात (लिव्हर) ठाण मांडले. त्याच्या यकृतात अनेक वर्षे व्रण निर्माण केले. त्या यकृताने मग जीव टाकला आणि त्याला यकृताचे प्रत्यारोपण करून घ्यावे लागले. एकंदरच आता याबाबतीत आणि रक्तदानाबाबतीत प्रचंड काळजी घेणे प्राप्त झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी आर्थर अॅश नावाचा एक कृष्णवर्णीय विम्बल्डन विजेता असाच एड्स या त्या काळच्या महाभयंकर रोगाला बळी पडला. कारण त्याच्यावर पूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेच्या वेळी एड्सच्या व्हायरसने दूषित असे रक्त देण्यात आले होते. रक्तदान पहिल्यांदा केले गेले पोप इनोसंट एकवर. हा इटलीमधला मोठा धर्मगुरू. याला तीन मुलांचे रक्त दिल्याची कथा आहे ५०० वर्षांपूर्वीची. त्यात स्वत: पोप तर गेलेच, पण तिन्ही मुलगेही मेले असे म्हणतात. त्या काळात रक्ताचे अभिसरण यकृत (लिव्हर) करते, अशी समजूत होती. पुढे १६२८ साली रक्ताभिसरण हृदयामुळे होते. तो एक पंप असतो आणि हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धिकरण पावते, असे विल्यम हार्वे याने दाखविले. १७७७ मध्ये लव्होयसियर याने रक्त हे प्राणवायूचे वाहक असते आणि इंजिन चालायला कोळसा जसा प्राणवायूच्या साहाय्याने जाळावा लागतो, त्याप्रमाणे रक्तातला प्राणवायू पेशींमधल्या जळणासाठी वापरला जातो आणि शरीर चालते, असा सिद्धांत मांडला. थोडे दिवस लोकांनी ऐकून घेतले. मग फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, तेव्हा असले निदैवी सिद्धांत मांडणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याचे ठरले आणि या फ्रेंच माणसांचा शिरच्छेद करण्यात आला; तेव्हा एक माणूस म्हणाला, ‘‘शिरच्छेद झाला एक मिनिटांत; परंतु असला मेंदू परत तयार व्हायला अजून १०० वर्षे जावी लागतील.’’ माणूस काय करील याचा खरंच काही नेम सांगता येत नाही.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : टॉन्सिल्स वाढणे : भाग २
टॉन्सिल्सच्या गाठी वाढणे, पिकणे, घट्ट होणे याकरिता विविध कारणे पुढीलप्रमाणे. १) खूप थंड, गोड, आंबट, खारट, कफ वाढविणारे, अभिष्यंदि (स्राव वाढविणारे) दह्य़ासारखे पदार्थ खाणे. २) गार वारा, थंडी, पाऊस यांचा संपर्क सहन न होणे. ३) वारंवार सर्दी पडसे, तापाचा अॅटॅक ४) घशास न मानवणाऱ्या पदार्थाचा आहार. ५) बोलण्याचे अतिश्रम. ६) घसा, कान, गळा यांचेकरिता अपुरे संरक्षण ७) दिवसभरात चहा, कोल्ड्रींक्स अशा उलट सुलट गुणधर्माच्या पदार्थाचे सेवन.
टॉन्सिल्सग्रस्त बालकांच्या गाठींची वाढ खूपच कमी असल्यास मीठ-हळद-गरम पाण्याच्या गुळण्या दोन-तीन वेळा कराव्या. गरम गरम पाणी प्यावयास सांगावे. थंड पदार्थ टाळावेत. असा उपचार करून महिना दोन महिने बघावे. एवढय़ाने टॉन्सिल्सची वाढ कमी होत नाही असे आढळल्यास हळकुंड उगाळावे; त्याचे गंध वाढलेल्या टॉन्सिल्सवर दिवसातून दोन वेळा लावावे. तेवढय़ाने सूज कमी होते का पहावे. ज्या लहान मुलांना गरम पाण्याच्या गुळण्या करता येत नाहीत,त्यांना गरम पाणी तोंडात ठेवून थुंकावयास सांगावे. टॉन्सिलच्या गाठी मोठय़ा व घट्ट असल्यास सुरवारी हिरडा उगाळून त्याचा दाट लेप गाठीवर लावावा. मोठय़ा माणसांच्या टॉन्सिल्स वाढलेल्या कमी व्हायला पोटातील औषधाने अधिक काळ लागतो. व्यक्ती बलवान असल्यासच सशास्त्र वमनकर्म करावे.
सामान्यपणे टॉन्सिलग्रस्त सर्व बालकांना लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमा गोळी प्र. ३ दोन वेळा; आरोग्यकाढा जेवणानंतर ३ चमचे समभाग पाण्याबरोबर द्यावा. महिनाभरात गाठी कमी होतात. बारीक ताप असल्यास ल.मा.वसंत ६ गोळ्या; कृमी असल्यास कृमीनाशक ३ गोळ्या ३ वेळा द्याव्या. पांडुता असल्यास चंद्रप्रभा योजावे. गळ्याला बाहेरून गाठ, दडसपणा असल्यास लेपगोळीचा दाट गरम लेप लावावा. वजन खूप कमी असल्यास सुधाजल ४ चमचे; वाहती सर्दी असल्यास रजन्यादि वटी ६ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. पालकांनो ‘फ्रीज विका’; बालकांना वाचवा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २५ मार्च
१८९८> वृत्तपत्रकार शिवराम महादेव परांजपे यांच्या ‘काळ’ या साप्ताहिकाचा पहिला अंक या दिवशी प्रकाशित झाला.  
१९२३> युद्धविषयक ग्रंथकार दिनकर विनायक गोखले यांचा जन्म. माओचे लष्करी आव्हान, भारत-चीन संबंधांचा समग्र अभ्यास, पहिले महायुद्ध असे अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन त्यांनी पत्रकारितेचा पेशा सांभाळून केले.
१९३२> कथांचे २५ संग्रह, सात कादंबऱ्या, कथाकथनाचे अनेक कार्यक्रम.. यांतून मराठीभाषक मध्यमवर्गीयांची सुख-दु:खे मांडणारे लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म. ‘सांगे वडिलांची कीर्ती’ आणि ‘वाट पाहणारे दार’ ही वडील आणि दिवंगत पत्नीची व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. त्यांच्या ललित लेखांचे संग्रह झाले. पुढे ओशो-प्रवचनांतून भावलेल्या अर्थावर आधारित ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले. २६ जून २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
१९९३> कवी, ललित निबंधकार आणि व्यक्तिचित्रणकार मधुकर बाबुराव केचे यांचा जन्म. ‘दिंडी गेली पुढे’ हा त्यांचा काव्यसंग्रह, तर ‘एक घोडचूक’, ‘पालखीच्या संगे’, ‘वंदे वंदनम’, ‘भटकंती’ हे लेखसंग्रह. ‘माझी काही गावं’मधून त्यांनी स्थलचित्रण केले, तसेच ‘वेगळे कुटुंब’ ही सामाजिक जाणिवेची व्यक्तिचित्रे लिहिली.  
– संजय वझरेकर