आपले जवान देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अतिशय प्रतिकूल प्रदेशात ठामपणे उभे राहत आहेत. सियाचिनसारख्या प्रदेशात त्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. त्यापासून सुटका व्हावी, यासाठी त्यांना खास जाकिटं दिली जातात. पण ती अवजड असतात. आधीच विरळ हवेपायी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या त्या प्रदेशात ते खोगीर अंगावर चढवून पहारा देत राहणे कसोटी पाहणारेच असते. त्याच्यावर मात करण्यासाठी नील पांचाल आणि खुशबू पटेल या दुकलीने ग्राफिन या कार्बनच्या अनोख्या अवताराच्या धाग्यांनी तयार केलेले जाकीट वापरण्याचे ठरवले. हा पदार्थ कार्बनच्या अणूंची अशी जोड करतो की एकाच अणूच्या जाडीइतकी जाडी असलेले वस्त्र तयार होऊ शकते. ते वजनाला हलके तर असतेच, पण दणकट आणि लवचीकही असते. त्याच्यापासून तयार झालेल्या जाकिटाची उष्णतावाहकता कमी असल्यामुळे एखाद्या थर्माससारखे ते त्याच्या आतले तापमान आरामदायी स्थितीत राखून ठेवू शकते. त्यामुळे कडक हिवाळयाबरोबर कहर करणाऱ्या उन्हाळयातही त्याचा वापर होऊ शकतो. राजस्थानासारख्या वाळवंटी प्रदेशाशी निगडित सीमारेषेवर दक्ष असणाऱ्या सैनिकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा >>> कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!

special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
dairy industry in maharashtra
अग्रलेख: दूध गेले, दही चालले..
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..

त्याची चाचणी घेताना प्रत्येक व्यक्तीची आरामाची कल्पना वेगवेगळी असू शकते याची जाणीव वैज्ञानिकांना झाली. कोणते तापमान सुसह्य आहे याची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. त्याची सोय करण्यासाठी त्यांनी या जाकिटावरच तापमान नियंत्रित करणारे बटण बसवले. तरीही ऐन पहाऱ्याच्या समयी त्या बटणाकडे लक्ष देणे सैनिकांना कदाचित शक्य होणार नाही, हे ध्यानात घेऊन पांचाल-पटेल या दुकलीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला. त्याच्या आज्ञावलीचा तापमान नियंत्रणात वापर करून वातावरणातल्या तापमानाचे मोजमाप करून त्या व्यक्तीने निर्धारित केलेले तापमान स्वयंचलितरीत्या राखण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्या आज्ञावलीमुळे जाकिटाचे वजन वाढणार नाही याचीही दक्षता घेतली गेली आहे. असे हे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त जाकीट सैन्यदलाच्या पसंतीला उतरले आहे. त्याचे मोठया प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org