जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळणे किफायतशीर दुग्ध व्यवसायातील महत्त्वाचे सूत्र आहे. परंतु आजही ८० टक्के शेतकरी अल्प, अत्यल्प भूधारक तसेच जिरायत भागातील असून काही दूध उत्पादक भूमिहीन आहेत. अन्नधान्य आणि नगदी पिकांची पाण्याची गरज भागवून राहिलेल्या पाण्यावर चारा पिकांचे नियोजन केले जाते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा मिळणे फारच कठीण असते. यावर उत्तम उपाय म्हणजे, मूरघास तयार करून त्याचा हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात वापर करणे.
मार्च ते जून-जुल या तीन-चार महिन्यांच्या काळात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. या कालावधीत मूरघासाचा वापर करता येतो. हिरव्या चाऱ्यातील पोषण मूल्यांच्या संवर्धनासहीत त्याचे पौष्टिक गुणधर्म वाढविण्यासाठी मूरघास ही चांगली संकल्पना आहे. ज्वारी, बाजरी, मका, ओट, चवळी, सोयाबीन, जयवंत, गीन्नी गवत, ऊसाचे वाढे याबरोबरच बरसीम, लसूणघास यांपासून मूरघास बनविता येतो.                
फुलोरा अवस्थेत आल्यानंतर पिकांमध्ये शुष्कांक ३० टक्के तर पाण्याचे प्रमाण ७० टक्के राहाते. अशा वेळी हिरव्या चाऱ्याचे चाफ कटरच्या साहाय्याने बारीक तुकडे करावेत. मूरघास बनविण्यासाठी जमिनीमध्ये चार ते साडेचार फूट रुंद, पाच ते सहा फूट खोल आणि गरजेनुसार पाच ते सहा फूट लांब खड्डा खोदून त्यामध्ये ३०० मायक्रॉन सिलपॉलीन पेपर वापरावा. जमिनीच्या वर चार फूट रुंद, आठ ते दहा फूट लांब आणि दहा फूट उंच खोलीचे बांधकाम करून त्यामध्येही मुरघास बनविता येतो. कापलेला चारा खड्डा किंवा खोलीमध्ये चांगल्या प्रकारे दाबावा, जेणेकरून चाऱ्यामध्ये हवा जाऊन चारा खराब होणार नाही. खड्डा भरल्यावर ५० ते ६० दिवसांनंतर मूरघास खाण्यासाठी तयार होतो. गरजेनुसार मूरघास काढून जनावरांना खाऊ घालावा. मूरघास तयार झाल्यावर त्याला आंबूस वास येतो. तयार होण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यावर अनेक जैविक प्रक्रिया होतात. त्यामुळे मूरघास उन्हाळ्यामध्येही जनावरांना पचविण्यास सोपा होतो. खड्डा भरल्यानंतर वर्षभर मूरघास व्यवस्थित राहतो. म्हणजेच मुबलक प्रमाणात हिरवा चारा असताना मूरघास बनवला तर टंचाईच्या काळातही जनावरांना खाद्य मिळू शकते.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. : त्सुनामी आणि ज्ञानेश्वरी
इंग्लंडहून परत आल्यावर थोडेफार नाव झाले हे नक्की. टिळक रुग्णालयात नव्या कल्पानांचा पाऊस पडत होता आणि खरोखरच बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थ्यांची रांग लागली होती आणि एक दिवस एक जबरदस्त भावनिक धक्का बसला. त्या मृत्यूचे गूढ अजूनही पोलिसांना बत्तीस वर्षांनंतर उलगडता आलेले नाही. त्सुनामी यावी तसे, आयुष्यात पहिल्यांदाच मी खचलो आणि माझे मन उद्ध्वस्त झाले आणि जगाबद्दल स्पष्टीकरणे मागू लागले. माझे कामावरचे लक्ष उडाले. तेव्हा मूळ स्वभाव जागा होऊन यावर काहीतरी उपाय शोधायच्या नादात एक दिवस माझ्या आत्याबाईची एक जुनी ज्ञानेश्वरीची प्रत उघडून वाचू लागलो तर त्यातल्या भाषेने, उपमा उत्प्रेक्षा दृष्टांतांनी आणि ज्ञानेश्वरांनी योजलेल्या रूपकांनी माझे मन आनंदाने भरून आले. आठवडाभर काम करून शनिवार-रविवार सहलीला जावे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम किंवा नाटक बघावे इतपतच त्या वाचनाचे स्वरूप होते आणि कदाचित अजूनही तसेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण रानावनात सहलीला जातो तेव्हा कुठे निसर्गाच्या मूळ स्वरूपाचा शोध घेतो? रागदारी ऐकल्यावर होणारा आनंद त्यातल्या शब्दांवर आधारित असेलही, परंतु त्या शब्दांचा मथितार्थ दूरच असतो. मला वाटते सतराव्या अध्यायात ‘नारदाचे गाणे ऐकून बरे वाटते, पण अर्थ आता तुझ्यामुळे कळला’ अशी ओवी ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या तोंडी श्रीकृष्णाला उद्देशून घातली आहे. अर्थात निसर्गाकडे बघताना जशी अनेकांना अनेक रूपे दृष्टीस पडतात तसेच ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही आहे. इथे भक्ती आहे की ज्ञान की कर्म आहे हे प्रत्येकाच्या बुद्धीवर किंवा वृत्तीवर ठरते. माणसे पशूपासून निराळी असतात, कारण ती संसारात बुडालेली असली तरी त्याच्यापलीकडे बघण्याचा प्रयत्न करतात. हे परतत्त्व नेहमीच सापडत नाही. मला तर नाहीच सापडले, म्हणून प्रयत्न काही थांबत नाही. त्या काळात ज्ञानेश्वरीच्या भाषेत बुडलेल्या ‘मी’ने नुसते हेच वाचून भागणार नाही तर बरोबरीने पाश्चिमात्य तत्त्वज्ञान वाचावे लागेल असे मनात घेतले आणि तेही वाचू लागलो. दुपारचा वेळ यासाठी राखून ठेवला. दुपारी जग जेव्हा कर्माचा डोंगर पोखरण्यात गुंग असे तेव्हा मी या बिळात शिरत असे. पाचसहा वर्षे या दुपारच्या वेळात मी संबंध ज्ञानेश्वरी अर्थासकट लिहून काढली होती. प्लास्टिक सर्जरीत मी त्वचेला कोलांटी उडी मारायला लावली होती. आता इथे ही बुडी मारली. या बुडीने मला अपरंपार आनंद दिला आहे. त्या बुडीबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते-rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : मधुमेह : भाग ४
सप्तकपी, सप्तरंगी, सप्तचक्रा अशा निरनिराळ्या नावाने ओळखली जाणारी मुळी उगाळून त्याचे चमचाभर गंध सकाळ सायंकाळ प्यावे. जांभळाच्या बियांचे चूर्ण २ वेळा एकेक चमचा घ्यावे. मधुमेहात यकृत दौर्बल्य किंवा भूक कमी असताना कुमारी आसव ४ चमचे दोन्ही जेवणानंतर समभाग पाण्याबरोबर घ्यावे. दुबळेपणा, पाठीचे, सांध्याचे विकार या तक्रारी मधुमेहाबरोबर असल्यास अश्वगंधारिष्ट ४ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. मानसिक कारणांनी मधुमेह निर्माण झाला असेल; चिंता, दडपण, धास्ती, कमी झोप यामुळे मधुमेहाची लक्षणे वाढत असल्यास; दोन्ही जेवणानंतर सारस्वतारिष्ट ४ चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. ब्राह्मी वटी तीन तीन गोळ्या दोन वेळा व निद्राकर वटी रात्रौ सहा गोळ्या घ्याव्यात. मधुमेहाच्या जखमा व त्वचाविकारांकरिता आरोग्यवर्धिनी, कामदुधा व प्रवाळ प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. त्याचबरोबर अनुपान म्हणून महातिक्तघृत २ चमचे घ्यावे. मधुमेहाबरोबर स्थौल्य हे लक्षण असल्यास त्रिफळा गुग्गुळ ३ किंवा ६ गोळ्या घ्याव्या. मधुमेहाबरोबर मूत्रपिंडाच्या तक्रारी असल्यास गोक्षुरादि गुग्गुळ ६ गोळ्या २ वेळा घ्याव्या. पांडुता असल्यास सुवर्णमक्षिकादी वटी ३/३ गोळ्या दोन वेळा घ्याव्या.
मधुमेहाच्या जखमा, पिटिका यांना प्रथम त्रिफळा काढय़ाने धुवावे. नंतर मध शोधनाकरिता व एलादि तेल व्रण रोपणाकरिता वापरावे. जखम चिघळत नाही यावर सतत लक्ष असावे. मधुमेह हा संतर्पणोत्थ म्हणजेच अधिक पोषणाने होणारा विकार आहे; हे लक्षात ठेवून स्थूल माणसाने आपल्या वजनाकडे म्हणजेच आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्यावयास हवे. भरपूर पाणी पिणे हे एक वजन वाढण्याचे कारण आहे, हे लक्षात ठेवून अकारण पाणी पिण्याचे टाळावे. मधुमेह हा कफप्रधान कारणांनी होणारा विकार आहे. याकरिता कफवर्धक आहारविहार कटाक्षाने टाळावेत. मधुमेह हा अनुवंशिक विकारांपैकी एक प्रमुख विकार; हे लक्षात घेऊन कुटुंबियांना मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २४ मे
१९२६ > कादंबरीकार, नाटककार सरदार चिंतामण नारायण मुजुमदार यांचे निधन. ‘शेवटचा शूर वाघेर’, ‘ लाख्या बारगीर’, ‘गुजराथचा समशेर बहाद्दर’, ‘राणा हमीर’ अशा ओजस्वी, प्रेरक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘चमत्कार- अथवा भ्रमनिरास’ हे नाटकही त्यांनी लिहिले होते.
२००४ > मराठीत तत्त्वशुद्ध नवसमीक्षेची बीजे रोवणारे समीक्षक, सौंदर्यमीमांसक आणि विचारवंत राजाराम भालचंद्र पाटणकर यांचे निधन. ‘सौंदर्यमीमांसा’ हा त्यांचा ग्रंथ (१९७४) सर्वाधिक गाजला, त्याला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला, परंतु त्यांचे पहिले पुस्तक म्हणजे १९६९ साली प्रकाशित झालेले ‘एस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम’. पुढे ‘कांटची सौंदर्यमीमांसा’, ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य’ हे सैद्धान्तिक चर्चेचे ग्रंथ, तसेच कमल देसाई यांचे कथाविश्व, ‘मुक्तिबोधांचे साहित्य’, ‘कथाकार शांताराम’ या त्यांच्या समकालीन लेखकांवरील टीकाग्रंथ त्यांनी लिहिले. कलाकृतीची निर्मिती आणि आस्वाद यांनी मिळून बनणारा कलाव्यवहार हा अन्य व्यवहारापासून स्वायत्त असतो, हा पाश्चात्य दृष्टिकोन मराठीत समर्थपणे मांडणाऱ्या ‘रा.भां’नी ‘एरिअल’ या टोपण नावाने कथा व कविताही लिहिल्या होत्या!
– संजय वझरेकर