श्रुती पानसे contact@shrutipanse.com

कधी कधी मुलं खूप अस्वस्थ असतात. पण आपल्याला नक्की काय होतंय हे त्यांना शब्दात सांगता येत नाही. ती रडतात, घाबरतात, त्यांना झोप लागत नाही, भूक लागत नाही. यावर काही आईबाबा ‘घाबरायला काय झालंय?’, ‘भ्यायचं कशाला एवढय़ा तेवढय़ावरून?’ अशा प्रतिक्रिया देतात. मात्र अशा वाक्यांतून प्रश्न सुटत नाहीत. अशी वाक्यं बोलण्यातून नकळतपणे आपण त्यांच्या भावना दडपून टाकत असतो. त्यांना भावना दडपून टाकायला शिकवत असतो.

भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत सांगतो की, भावना दडपून टाकण्याऐवजी त्यांना ओळखलं पाहिजे. मुलांच्या मनात नेमक्या या भावना का येताहेत, ती अशी का वागताहेत, त्या वागण्यामागचं मूळ  कारण शोधलं पाहिजे. मनात निर्माण होणारी कोणतीही भावना ही नैसर्गिकच असते. एखाद्या घटनेचा परिणाम म्हणून ती निर्माण होत असते. म्हणून त्या व्यक्त करायच्या असतातच, त्या नाही केल्या, दडपल्या तर त्याचा मनावर वाईट परिणाम होतो. पण शरीरावरही वाईट परिणाम होतो. म्हणून भावना योग्य पद्धतीने मोकळ्या करणंही तितकंच आवश्यक!

खरंतर छोटी मुलं म्हणजे खळाळता झराच! आनंद, दु:ख, राग. सगळंच झऱ्यासारखं येतं आणि वाहून जातं. त्यावर कोणालाच बांध घालता येत नाही. तीन-चार वर्षांपर्यंत तो घालूही नये. मोठय़ा माणसांना स्वत:च्या भावना बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतात, पण लहान मुलांचं तसं अजिबात नसतं. त्यांच्या भावना मनमुक्त असतात. राग येणं, गंमत वाटणं/ हसू येणं, आनंद वाटणं या भावना मुलं व्यक्त करतात. पण ताण, अस्वस्थता अशा गोष्टींचं काय करायचं हे त्यांना समजत नाही. मित्राशी किंवा मत्रिणीशी भांडून घरी आलेलं मूल नुसतंच धुमसेल. पण त्यांना आपल्या भावना ओळखता येणार नाहीत.

त्यांच्या मनातल्या गोष्टी गप्पा मारून जाणून घ्याव्या लागतील. नक्की कोणाचा राग आलाय, कोणाच्या वागण्यामुळे, रागावण्यामुळे मुलं कसल्या विचारात रेंगाळताहेत का, हे लहान मुलांच्या बाबतीत तरी समजायला हवं. यामुळे त्यांचं मन हलकं होतं.

म्हणजेच रसायनांच्या भाषेत बोलायचं तर नकारात्मक रसायनं निघून जातात आणि ऑक्सीटोसिनसारखी आनंदी, मनात विश्वासाची भावना निर्माण करणारी रसायनं निर्माण होतात.