News Flash

कुतूहल : फलधारणेसाठी प्रकाश कसा मिळवायचा?

वनस्पतीच्या ज्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणीच तिला फुले किंवा फळे लागतात. सूर्याचा प्रकाश मिळाल्याखेरीज आपली बीजुके निर्माण करावयाची नाहीत हा गुणधर्म काही बुरश्या

| January 17, 2013 12:10 pm

वनस्पतीच्या ज्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणीच तिला फुले किंवा फळे लागतात. सूर्याचा प्रकाश मिळाल्याखेरीज आपली बीजुके निर्माण करावयाची नाहीत हा गुणधर्म काही बुरश्या आणि अळिंबांमध्येही आढळतो. आपल्यावर दुसऱ्या वनस्पतीची सावली पडली आहे हे ओळखण्यासाठी हिरव्या वनस्पतींमध्ये एक स्वतंत्र यंत्रणा असते. शेतात लावलेल्या वनस्पतींची परस्परांवर सावली पडून त्यांपासून येणारे उत्पन्न कमी होऊ नये यासाठी पिकाच्या दोन ओळींमध्ये आणि एका ओळीतल्या दोन रोपांमध्ये किती अंतर असावे याचे पिकाच्या जातीनुसार नियम ठरविलेले आहेत. पाने अरुंद असल्याने गहू किंवा भात या पिकांमधील वनस्पती एकमेकांपासून खूप जवळजवळ वाढविता येतात, पण ज्वारी आणि मका यांची पाने त्या मानाने लांब व रुंद असल्याने या वनस्पतींमध्ये अधिक अंतर सोडावे लागते. एरंडी किंवा केळी या पिकांमधील वनस्पती तर परस्परांपासून चांगल्या एक ते दीड मीटर अंतरावर लावतात. प्रमाणाबाहेर दाट लावलेले पीक भरपूर जैवभार उत्पन्न करते, पण अशा पिकातल्या वनस्पतींच्या परस्परांवर पडणाऱ्या सावलीमुळे त्यांपासून धान्य, शेंगा किंवा फळे कमी प्रमाणात मिळतात. प्रस्तुत लेखकाने प्रयोगांती असे दाखवून दिले की, अत्यंत दाट लावलेल्या रुंदपर्णी वनस्पतींच्या सावलीतल्या भागाला जर रोज सूर्यास्तानंतर सुमारे पाच-दहा मिनिटे प्रकाश दिला तर अशा वनस्पतींना विरळ लावलेल्या पिकाप्रमाणेच फुले-फळे धरतात. या विषयावर अधिक संशोधन करताना प्रस्तुत लेखकाला पुढे असे आढळून आले की, हा शोध निसर्गाने पूर्वीच लावलेला आहे. कडधान्य गटातील वनस्पती सूर्यास्ताच्या सुमाराला आपली पाने मिटून घेतात. त्यामुळे रोज संध्याकाळी शेवटचा सूर्यप्रकाश या वनस्पतींच्या अगदी तळापर्यंत जातो. त्यामुळे या गटातली पिके रुंदपर्णी असूनही ती दाट लावली तरी त्यांचे उत्पन्न कमी न होता उलट ते वाढते. चार्ल्स डार्वनिने सुमारे १५० वर्षांपूर्वी ‘कडधान्य गटातील वनस्पती संध्याकाळी आपली पाने का मिटून घेतात’ हे वनस्पतिशास्त्रज्ञांना विचारले होते. प्रस्तुत लेखकाने या संशोधनाद्वारे या प्रश्नाचे उत्तर दिले.   
-डॉ.आनंद कर्वे, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:कामशेतचे कानिटकर
येवल्याला असताना मी तिसरीत होतो (म्हणजे हल्लीची सातवी) वय र्वष ११. मला वाटते १९५० च्या सुरुवातीला पुण्यामधल्या एका नामवंत शिक्षकांच्या मनात एक कल्पना चमकली. इंग्लंडमधल्या दूर ईटन आणि हॅरो या सुप्रसिद्ध शाळांच्या धर्तीवर पुण्याच्या आसपास पण गावापासून बऱ्यापैकी दूर एक शाळा काढावी आणि त्यातले विद्यार्थी घरी न राहता तिथल्याच वसतिगृहात ठेवावेत. त्या शिक्षकाचे नाव कानिटकर. त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांनी कामशेतला जागाही दिली. कामशेत स्टेशन लोणावळा-पुणे मार्गावर आहे. असल्या जागी कोठलेच पालक मुले पाठविण्यास तयार होईनात. कानिटकर आमच्या कुटुंबाचे ओळखीचे आणि दूरचे नातेवाईक. माझ्या वडिलांना ते म्हणाले, ‘‘तुला दोन मुले आहेत. सध्या एक दे.’’ अशा तऱ्हेने मी त्या शाळेत रुजू झालो. शाळेत एकंदर विद्यार्थी १४, त्यातल्या पाच मुली. इंद्रायणी नदीला लागून राहायची जागा होती. वर्ग बऱ्याच वेळा झाडाखाली भरत. पुण्याहून सकाळच्या गाडीने चार-पाच शिक्षक येत, दुपारच्या गाडीने परत जात. कानिटकर स्वत: तिथे राहात असत. सकाळी पाच-साडेपाचला आम्हाला उठवीत, आम्हाला आंघोळी घालत आणि सूर्योदयाआधी पळायला घेऊन जात.
सूर्य अगदी उगवताना किलकिल्या डोळ्यांनी बघण्याचा एक कार्यक्रम असे. मग गीतेचे एक किंवा दोन अध्याय, मग न्याहारी व तीन वाजेपर्यंत तथाकथित शाळा असा कार्यक्रम. आम्हाला सगळ्यांना इंद्रायणी नदीत पोहायला शिकविण्यात आले. इथे मी उदंड निसर्ग पाहिला. वीज नव्हती, रात्री टॉर्च पेटवला तर कोल्ह्य़ांची रांग दिसे, त्यांचे डोळे चकाकत. काजवेही मी इथेच प्रथम बघितले. लाजाळूचे आणि तुतीचे दर्शन इथलेच. इथे असंख्य खेकडे होते ते कसे पकडायचे हे इथेच कळले. विंचू पकडताना नांगीने पकडावा याचे प्रात्यक्षिक इथेच बघितले. ऑफ ब्रेक कसा टाकायचा हे इथल्याच व्यायाम शिक्षकांनी दाखविले. पानातून क्लोरोफिल कसे काढायचे, खोली काळीकुट्ट करून त्यात एका खिडकीला भोक पाडले तर बाहेरची माणसे आत उलटी दिसतात हे पिनहोल कॅमेऱ्याचे रहस्य इथेच उलगडले. मनसोक्त उंदडणे त्यामुळे मी इथे रमलो होतो. दोन सापांमधला प्रणय मी इथेच बघितला. हा वाईट शकून असतो म्हणून आमचे डोळे झाकण्यात आले. मी आता पौगंडावस्थेत येत होतो. मुलगे आणि मुली हा फरक जाणवू लागला होता. पोहताना त्या कपडय़ासकट पोहत असत आणि नंतर आमच्यासारखे निर्लज्जपणे कपडे न बदलता त्या पळत पळत वसतिगृहात जात हा फरक मी नोंदला होता.
 वर्ष सरू लागले तसे कानिटकर खिन्न दिसू लागले. मग मला कळले की, आर्थिक पाठबळ काढून घेण्यात आले होते, शाळा बंद पडणार होती. निरोप घेण्याचा दिवस आला तेव्हा आमच्यातल्या मुली रडल्या. आई घेऊन जायला आली होती. मला म्हणाली, ‘‘आता मॅट्रिकपर्यंत पुण्यातच राहायचं आहे.’’
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : आमवात
आमवात हा विकार जगभर सर्वच थरातील लोकांना; वय, व्यवसाय, संपत्ती या कशाचाही संबंध नसता; खूप मोठय़ा संख्येने पीडत आलेला आहे. या विकारात तीन प्रमख लक्षणे सूज, पीडा व जखडणे अशी अलटून पालटून केव्हाही कोणत्याही वेळी; रुग्णाच्या शरीराच्या कोणत्याही भागाला त्रास देत असतात. आमवात हा शरीरातील मोठय़ा सांध्यांना तसेच स्नायूंवर आघात करतो. गुडघा, कंबर, खांदा, मनगट, पाठ असा कोणताही अवयव केव्हाही जखडला जातो. याची सुरुवात चोर पावलाने हळूच होते. थंडी, गारठा, खूप पाऊस, अवघडून प्रवास अशा कोणत्यातरी कारणाने रोग एकदम शरीराचा एक एक भाग जखडावयास लागतो. या विकारात बोटे, मनगट, ढोपर, खांदा कंबर, गुडघा यांच्यावर सूज आहे का ते पहावे. त्यातल्या कोणत्या भागाची सहज, नैसर्गिक हालचाल होत नाही, याची दखल घ्यावी. कटकट असा सांध्यात आवाज येतो का ते पहावे. जिभेवर चिकटपणा, थर पहावा. संडासला चिकट होते का, बारीक ताप येतो का, याची चौकशी करावी.
खूप औषधे घेण्याऐवजी गरम पाण्याने शेकले तर बरे वाटते, असे लक्षात आले की शेक, व्यायाम या उपचारांची योजना करता येते. भूक राखून जेवले तर बरे वाटते याचाही उपयोग उपचार ठरविण्याकरिता होतो. एरंडेल तेलाचाही उपयोग होऊ शकतो. त्यासाठी रोजच्या जेवणातील चपातीच्या कणकेमध्ये एका पोळीला एक चमचा तेल, या हिशोबाने कणीक कालवावी. तसेच एरंडेल तेलावर परतलेली सुंठ; दोन्ही जेवणानंतर अर्धा चमचा, गरम पाण्याबरोबर घेतल्यास काही प्रमाणात आराम मिळतो. आमवातावरची दोन प्रमुख औषधे म्हणजे सिंहनाद गुग्गुळ व गोक्षुरादी गुग्गुळ होत. मोठय़ा सांध्यातून कटकट आवाज येत असल्यास लाक्षादी गुग्गुळ योजावा. खूप सूज असल्यास दोषघ्न लेप गोळीचा दाट व गरम लेप लावावा. दुखऱ्या, जखडलेल्या, सूज असलेल्या भागाला सकाळ – सायंकाळ महानारायण तेल, चंदनबला तेल किंवा गवती चहा अर्क मिसळलेल्या तेलाचा तारतम्याने वापर करावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १७ जानेवारी
१९०६ >  कर्तृत्ववान विदुषी आणि साहित्यिक शकुंतलाबाई परांजपे यांचा जन्म. हुजूरपागेत मॅट्रिक, फर्गसन कॉलेजात बी. एससी. तर केम्ब्रिज विद्यापीठातून एम. ए. असा त्यांचा शैक्षणिक प्रवास झाला. पुण्यात परतून त्यांनी र. धों. कर्वे यांच्या बरोबरीने संततिनियमनाचा प्रसार-प्रचार केला. ‘पाळणा लांबवायचा की थांबवायचा’ हे पुस्तक बाईंचे.  ‘कुंकू’ या चित्रपटात सुशिक्षित मुलीची भूमिका करणाऱ्या    शकुंतलाबाईंनी चार नाटके लिहिली, त्यापैकी ‘पांघरलेली कातडी’ आणि ‘घरचा मालक’ या नाटकांतील कोळीण व चांदणी या व्यक्तिरेखा अशिक्षित स्त्रीही चाणाक्ष असते, असे दाखवणाऱ्या आहेत! चिंगी, मुके सोबती ही त्यांची अन्य नाटके, तर ‘सोयरीक’ व ‘लागेबांधे’ ही (फ्रेंचमधून) रूपांतर केलेली नाटके. भिल्लिणीची बोरे, काही आंबट काही गोड, माझी प्रेतयात्रा आदी ललित साहित्य त्यांनी लिहिले आणि ‘सवाई सहांची  करामत’ ही किशोर कादंबरिमालाही त्यांची.
१९०७ >  संस्कृत ग्रंथांचे संपादक आणि अध्यापनशास्त्र विषयक लेखक आबाजी विष्णू काथवटे यांचे निधन. फाउलरच्या इंग्रजी ग्रंथाधारे ‘शिक्षण व अध्यापन’ हे पुस्तक त्यांनी सिद्ध केले होते.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 12:10 pm

Web Title: how to bring light for fruit grownup
टॅग : Kutuhal,Navneet
Next Stories
1 येवल्याचा टांगेवाला / अनेक विरोधाभास
2 जे देखे रवी.. – देव
3 कुतूहल : सूरपाल कोण होता? (पूर्वार्ध)
Just Now!
X