25 September 2020

News Flash

कुतूहल : बांधकामात सुरक्षितता

अनेक वेळा आपण बांधकामादरम्यान अपघात झाल्याच्या बातम्या वाचतो. अपघात म्हटला की हानी आलीच, कधी जीवितहानी, कधी वित्तहानी. आपण ही हानी टाळू शकतच नाही का? नक्कीच

| December 19, 2012 03:33 am

अनेक वेळा आपण बांधकामादरम्यान अपघात झाल्याच्या बातम्या वाचतो. अपघात म्हटला की हानी आलीच, कधी जीवितहानी, कधी वित्तहानी. आपण ही हानी टाळू शकतच नाही का? नक्कीच टाळू शकतो, त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपली बांधकामे विविध प्रकारची असतात. कुठे छोटे एकमजली, दुमजली घर, तर कधी अनेक मजली गगनचुंबी इमारत, कधी पूल, कधी बोगदे, मालवाहू  आणि प्रवासी बोटींचे धक्के, इस्पितळे, शाळा, सिनेमा आणि नाटय़गृहे, स्टेडियम अशी अनेक प्रकारची बांधकामे सगळीकडे चालू असतात. बांधकामांची सुरुवात आपण तज्ज्ञ वास्तुविशारद आणि संरचना अभियंत्यांकडून आराखडे काढून करतो. त्यासाठी आखून दिलेले नियम पाळतो आणि ते आराखडे प्रत्यक्षात उतरवायला सुरू करतो. सर्वप्रथम जागेचे नीट मोजमाप करून घेणे जरूर आहे. त्यानंतर सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. बांधकाम साहित्यसुद्धा चांगल्या दर्जाचे हवे. बांबू, फळ्या, फावडे  कुदळी, घमेली, सर्व आणून कामास सुरुवात होते. पायासाठी खोदकाम सुरू होते. त्यातून खणून निघालेल्या मातीचे काय करायचे ते आधीच ठरवावे. अनेक वेळा ती माती सरळ रस्त्यावर ढीग करून टाकतात, उचलू नंतर अशा विचाराने. पण हा ‘नंतर’ जरा जास्तच लांबतो आणि हळूहळू तो ढीग तिथेच सपाट व्हायला लागतो आणि छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे कारण बनतो. जेव्हा वाळू, खडी येऊन पडते, तेव्हाही ते ढीग असेच रस्त्याच्या कडेला लावलेले दिसतात. मातीच्या ढिगासारखेच त्यांचेही मग होते. सर्व बांधकाम साहित्य नीटपणे सांभाळायला हवे. ल्ल साहित्याची खरेदी करताना दर्जाचा विचार व्हायलाच हवा. केवळ काही पसे वाचतात म्हणून निम्नदर्जाचे साहित्य घेऊ नये. रेती, खडी योग्य आकाराची घ्यावी. विटा उत्तम भाजलेल्या, अखंड आणि कोरडय़ा हव्यात. हल्ली विटांच्या ऐवजी सिपोरेक्स वापरतात. मातीच्या विटांपेक्षा वजनाने कमी असल्यामुळे सिपोरेक्समुळे इमारतीवरील बोजा कमी होतो. विटा किंवा हे ब्लॉक्सपण नीट रचून ठेवावेत. कितीही उत्तम आराखडा असला तरी निकृष्ट प्रतीच्या बांधकामाने इमारत खिळखिळी होते.
कीर्ती वडाळकर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. : मी मज हरपून बसले गं..
सुरेश भटांसारखा विलक्षण ताकदीचा कवी एखादं गाणं लिहून जातो, तितक्याच समर्थपणे आशाताई ते गातात. पं. हृदयनाथ मंगेशकर गाण्याला संगीतबद्ध करतात आणि आपण फक्त ऐकत राहतो. ‘मी मज हरपून बसले गं’ या नाटय़गीतासम गाण्याविषयी बोलतोय. प्रत्येक वेळी या गाण्यानं मी हरपून जातो, माझा मी राहात नाही. एका अलौकिक अनुभवात हरवून जातो. ते सूर मनात एक आगळंवेगळं विश्व निर्माण करतात. त्यातून हळूहळू सावरलो की, मनातला मानसशास्त्रज्ञ जागा होतो आणि माझ्या मनातल्या आर्ततेचा भावानुभवाचा अर्थ लावतो.
मित्रा, गाणं छान आहे वगैरे म्हणून सोडून देऊ नकोस हं. या गाण्यातली गंमत परकाया प्रवेश केलास तरच पूर्ण अर्थाने आजमावता येईल.
राधाकृष्ण यांच्या मधुर भक्तीची आणि मधुर मीलनाची महती गाणारी ही रचना आहे. गाण्यातल्या प्रत्येक चरणातून राधाकृष्णाच्या प्रत्यक्ष प्रणयाचं प्रतीकात्मक वर्णन आहे. श्रीरंग राधेला तिच्या साखरझोपेत टिपतो. पहाटेचा हा काळ अगदी सूचक. निद्रा ओसरली आहे, पण त्या गोड स्वप्नांची धुंदी पापण्यांवर रेंगाळते आहे. अशा नाजूक क्षणी श्रीरंग तिच्याशी संग करतो. पण राधा नुकतीच जागी होत्येय, तेव्हा आता धसमुसळा प्रणय नाही तर प्राजक्ताच्या फुलाला हलकेच उचलावे आणि त्याचा सुगंध घ्यावा तशा हळुवारपणे तो राधेला श्वासांनी स्पर्श करतो. साक्षात त्या मुरलीधराचा श्वास तिचे अंग अंग कुरवाळतो. त्याचा स्पर्श लोभस नि प्रणयासक्त, त्यानं राधा थरारते. अंगावरच्या रोमांचानी तिचा ज्योतीसारखा तेजस्वी देह लवलवतो. त्या श्वासामागोमाग येतो त्याचा हस्तस्पर्श. बासरीचे सूर छेडणारे, अलगदपणे केसात मोरपीस खोवणारे त्याचे हात म्हणजे कमलदल. त्या स्पर्शाची जादू अंगभर पसरते, त्या स्पर्शात वखवख नाही, आवेग आहे. त्या स्पर्शात लय आहे आणि त्या हिंदोळ्यावर झुलावं तशी राधा त्या स्पर्शाच्या तालाला एकतानतेनं प्रतिसाद देते आहे. शरीरमीलनाचा हा झूला म्हणजे परमोच्च सुखाकडे नेणारं नृत्य आहे. त्या अनुभवात गुंग झालेली राधा लाजते, तिचं सारं स्त्रीत्व उमलतं. ती कृष्णाच्या स्वाधीन होते. तो क्षण एखाद्या बिजलीसारखा शरीरातून सळसळतो. त्या क्षणी ती नेत्र उघडते तेव्हा तिला देवकीनंदन दिसतो. तिच्या समर्पणाचं सार्थक होतं. त्या नभशामल मिठीत ती पूर्णपणे सामावून जाते. स्वत्त्व हरपून जातं आणि अहंत्वाची जाणीव लोपते. राधाकृष्णाच्या शारीरिक मीलनाचा हा उत्कट अद्वैत क्षण सुरेश भट इतक्या सहजपणे उलगडतात की, हे नेमकं काय ऐकलं याची हळूहळू जाणीव होते आणि मग पहाटेच्या त्या मीलनाच्या आठवणीनं हरखून गेलेली प्रणयमुग्ध राधा डोळ्यांसमोर साकारते. अखेर, राधाकृष्णाच्या जोडीतली ‘राधा’ मनात रुजते. तीच खरी कारण साक्षात कृष्णाशी तिचा संगम झाला, त्याच्याशी एकरूप होऊन ती तृप्तपणे आपल्याला तिची कहाणी सांगायला राहिली. खरं सांगू मित्रा, मला ना रे राधेचाच हेवा वाटतो.. हरपून गेल्यावर शिल्लक राहाते, ती एकच आस.. राधा.. राधा.. राधा..
मी मज हरपून बसले गं, सखी मज हरपून बसले गं.
आज पहाटे श्रीरंगाने, मजला पुरते लुटले गं
साखरझोपेमध्येच अलगद, प्राजक्तासम टिपले गं
त्या श्वासांनी दीपकळीगत, पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले गं
त्या नभशामल मिठीत नकळत, बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो देवकीनंदन, अन् मी डोळे मिटले गं.
डॉ. राजेंद्र बर्वे  –  drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. : १९ डिसेंबर
१७८२ नायट्रोजन आणि क्लोरिन वायूंच्या संशोधनासंदर्भात महत्त्वाचे कार्य करणारे शास्त्रज्ञ स्वील कार्ल यांचा जन्म.
१९५२ आंध्र प्रदेश राज्य स्थापण्याचा निर्णय झाला. राज्यस्थापनेच्या आर्थिक बाजू व अन्य बाजू तपासण्याच्या संदर्भात न्यायमूर्ती वांछू यांची नेमणूक.
१९६१ गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थाने विलीनीकरणाचा प्रश्न सुटला. परंतु पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते. १९४५ पासून डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली ‘गोवा यूथ लीग’चा संघर्ष चालू होता. १९४६ मध्ये गोवा मुक्तीसाठी राममनोहर लोहिया यांनी लढा सुरू केला. गुजरातमध्ये ‘आझाद गोमंतक दल’ स्थापन करण्यात येऊन दादरा आणि नगर हवेली प्रदेश या दलाच्या सदस्यांनी स्वतंत्र केला. पोर्तुगीजांशी संघर्ष करून २ ऑगस्ट १९५४ रोजी हा प्रदेश मुक्त करण्यात आला. या लढय़ात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रात याच दरम्यान स्थापन झालेल्या गोवामुक्ती समितीने महाराष्ट्रातून अनेक सत्याग्रहींच्या तुकडय़ा गोव्यात पाठविल्या होत्या. ना. ग. गोरे, सुधीर फडके, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, जोशी महादेवशास्त्री व सुधाताई, मोहन रानडे यांचा त्यात सक्रिय सहभाग होता. पोर्तुगीज जुलमी सत्तेला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने लष्करास पाचारण केले. भारतीय लष्कराने पोर्तुगीजांचा पराभव केला आणि भारतीय भूमीवरून साम्राज्यवादाचे उच्चाटन झाले.
प्रा. गणेश राऊत  –  ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : प्राचीन केरळातले नाड प्रशासन
केरळ हे नाव केराली या शब्दावरून आलेले आहे, असे समजले जाते. केराली म्हणजे नारळ. त्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात नारळाची लागवड केली जाते. त्यामुळे हे नाव पडले असावे. परशुरामाने समुद्र मागे हटवून तेथली जमीन संपादन केली, अशी आख्यायिका आहे. नंतर परशुरामाने त्या भागात चौसष्ट गावे स्थापन केली. या गावांसाठी एक शासनकर्ता राजा निवडण्याची प्रथा सुरू झाली. त्या राजाला ‘पेरूमल’ म्हणत. पेरूमल म्हणजे परमेश्वर. पेरूमल बारा वर्षे राज्य करी. पेरूमलच्या मुख्य गावाचे नाव होते कांगानूर. दर बारा वर्षांनी राजाच्या नेमणुकीचा मोठा समारंभ होत असे. या समारंभात ‘मामनक्कम’ किंवा ‘महामख’ किंवा ‘ओनम’ असे नाव होते.
साधारणत: इ.स. ५० मध्ये उत्तर केरळच्या प्रदेशात चेरा या घराण्याचे राज्य स्थापन झाले. त्या काळात केरळमध्ये नंबुतिरी ब्राह्मण आणि नायर या जमातींकडे समाजाचे नेतृत्व होते. नंबुतिरींकडे न्यायनिवाडा व जमातीतील तंटे सोडविण्याचे काम असे. नायर म्हणजे लोकनायक नायर हे मूळचे तामीळ लोक पुढे स्थलांतर करून केरळात स्थायिक झाले. नायरांकडे राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. राज्य व्यवस्थेसाठी राज्यांचे लहान लहान भाग केलेले असत. त्यांना ‘नाड’ असे म्हणत. नाड म्हणजे नायरच्या राज्याचा टापू. प्रत्येक नाडात सहाशे कुटुंबे असत. नाडातल्या प्रत्येक कुटुंबाचा एक प्रतिनिधी घेऊन सहाशे लोकांचे एक ‘षटसत’ म्हणजेच सहाशे लोकांची परिषद भरत असे. करवसुली, लष्करी ठेवणे, न्यायनिवाडा ही नाडची जबाबदारी होती. नाडच्या पोटभागास ‘तर’ म्हणत. तेरू म्हणजे गल्ली. चार कुटुंबाचे एक तर असे. तराच्या मुख्यास ‘कर्णावर’ असे म्हणत. सर्व नाडांचा मिळून एक सार्वभौम राजा असे. नाडांच्या सभेला ‘कुट्ट’ म्हणत. १७९१ साली केरळ ब्रिटिश साम्राज्यात आल्यावर नाड ही व्यवस्था बंद झाली.
सुनीत पोतनीस  –  sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 3:33 am

Web Title: kutuhal security in construction
टॅग Kutuhal,Navneet
Next Stories
1 कुतूहल : धोका व्यवस्थापनाचे महत्त्व
2 कुतूहल -मोठय़ा उद्योगातील धोका व्यवस्थापन
3 कुतूहल -जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व
Just Now!
X