News Flash

कुतूहल – लखनवी चिकन

चिकन काम करणारे तंत्र चिकनकारी या नावाने ओळखले जाते.

कुतूहल – लखनवी चिकन
चिकनकारी करताना मूळ कापडावर प्रथम नक्षीचे ब्लॉक प्रिंट केले जातात.

कापड बाजारातील प्रसिद्ध प्रकार म्हणजे लखनवी चिकन. लखनौ येथील नूरजहाँ या राणीने ही पद्धत सुरू करून दिली, असा सार्वत्रिक समज आहे. मूळ पर्शियन शब्दावरून चिकन हा शब्द हिंदीत आला. चिकन या पर्शियन शब्दाचा अर्थ सुया आणि धागे वापरून भरतकाम करणे असा आहे आणि तीच पद्धत लखनवी चिकन तयार करताना वापरली जाते. चिकनची सुरुवात पांढऱ्या कापडावर पांढऱ्या दोऱ्याने भरतकाम करून झाली.
चिकन काम करणारे तंत्र चिकनकारी या नावाने ओळखले जाते. चिकनकारी हे अतिशय नाजूक आणि कौशल्याने हाती केलेले भरतकाम आहे. हे भरतकाम करायला मस्लीन, रेशमी, शिफॉन, ऑरगंझा इत्यादी तलम कापड प्रकार वापरले जातात. चिकनकारी करायला प्रामुख्याने पांढऱ्या धाग्याचा वापर केला जात असे. तसेच भरतकाम करावयाचे कापड अगदी फिक्या रंगाच्या तलम मस्लीन प्रकारचे आणि सुती असायचे. आता मात्र हे भरतकाम रंगीत सुती आणि रेशमी धाग्यानेपण केले जाते. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन चिकनकारीला अद्ययावत ठेवण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. या बदलामुळे चिकनकारीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
बदलत्या काळानुसार भरतकामाचे मुकैश, कामदानी, बदला इत्यादी नमुने लखनवी चिकनने स्वीकारले आहेत. तसेच छोटय़ा आरशांचा वापरही या भरतकामात केला जात आहे. या पद्धतीमुळे लखनी चिकनला एक वेगळे परिमाण लाभले आहे. चिकनकारी करायला तलम सुती, सेमी जॉर्जेट, क्रेप आणि इतर तलम कापडांचा वापर केला जातो. तसेच हे भरतकाम या कापडांवर उठून दिसते. जाडय़ा कापडांवर हा उठावदारपणा येत नाही, शिवाय सुईचे भरतकाम करणेही जिकिरीचे ठरते.
चिकनकारी करताना मूळ कापडावर प्रथम नक्षीचे ब्लॉक प्रिंट केले जातात. यामध्ये एक किंवा अधिक नमुने असू शकतात. मग कारागीर त्या नक्षीकामावर काळजीपूर्वक भरतकाम करतो. त्यानंतर तो कपडा स्वच्छ धुतला जातो. त्या वेळी ब्लॉक प्रिंटिंगची नामोनिशाणी मिटवली जाते. डिझाइनची निवड चोखंदळपणे केली जाते. तसेच भरतकामाचे विविध प्रकार वापरले जातात. त्यामध्ये भरतकामासाठीचे वेगळे टाके वापरतात. चिकनकारीमध्ये टाक्यांचे एकूण ३६ प्रकार वापरात आहेत, त्यामुळे चांगली विविधता येते.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – त्रिपुरा राज्य स्थापना
ईशान्य भारतातील त्रिपुरा हा प्रांत ब्रिटिश राजमध्ये त्रिपुरा याच नावाने प्रसिद्ध संस्थान होते. १०,६००चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाची लोकसंख्या १९४१ साली पाच लाखांहून अधिक होती. ब्रिटिश राजवटीने या संस्थानाला १३ तोफांच्या सलामींचा मान दिला. आगरताळा हे प्रमुख राजधानीचे शहर असलेल्या या संस्थानात १४६० खेडी अंतर्भूत होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात जमीनदार असलेल्या एका तरुणाने वन्य जमातींच्या आक्रमणांपासून आपल्या गावाचे रक्षण केल्यामुळे त्याच्याकडे पंचक्रोशीतील लोकांचे नेतेपण आले. पुढे त्याचा वंशज महामाणिक्य याने १४०० साली आसपासच्या खेडय़ापाडय़ांचे मिळून लहान राज्य स्थापन केले. पंधराव्या शतकात त्रिपुराच्या राज्यकर्त्यांनी आपल्या प्रदेशात भर घालून मोठा राज्यविस्तार केला. या राजांनी ‘माणिक्य’ हे आपल्या घराण्याचे नाव केले. सोळाव्या शतकात त्रिपुरा राज्यकत्रे मोगल सत्तेचे मांडलिक झाले. १७६४ साली वलसरच्या लढाईनंतर बंगालमधील मोगल राज्य प्रदेश ब्रिटिशांकडे आला. शेजारचे त्रिपुरा राज्य १८०९ मध्ये कंपनी सरकार संरक्षित संस्थान बनले. १८२६ ते १८५२ या काळात राज्याच्या पूर्व भागातील कुकी या जमातींच्या टोळ्यांनी अनेक वेळा खेडय़ांवर हल्ला करून धुमाकूळ घातला. कत्तल आणि लूट केली. त्या काळात त्रिपुराच्या माणिक्य या राजघराण्यात राजेपदाच्या वारसाहक्क संबंधात ठरावीक संहिता नव्हती. या अधिकारावरून राजघराण्यातल्या तरुणांमधील संघर्ष ही नित्याची बाब होती. अनेक जण त्यासाठी कुकी टोळ्यांचा उपयोग भाडोत्री सनिक, मारेकरी म्हणूनही करीत. १९०४ साली ब्रिटिशांनी त्रिपुराच्या वारसाहक्क संबंधात एक संहिता करून तशी सनद त्या संस्थानाला दिली. त्यानंतर राजेपदावर येणाऱ्या प्रत्येक राजकुमाराला ब्रिटिश व्हाइसरॉयकडून त्याबाबत मंजुरी घ्यावी लागे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2015 1:45 am

Web Title: lucknowi chikan sarees
Next Stories
1 रामपूरचे ‘रझा ग्रंथालय’
2 रामपूर राज्यस्थापना
3 कुतूहल – नेटवर्किंग
Just Now!
X