23 November 2017

News Flash

कुतूहल- इमारतीचे बांधकाम

जसजसे बांधकाम वर चढते तसतशी अधिकाधिक काळजी घ्यावी लागते. पाया घालून झाला की प्रत्यक्ष

मुंबई २२ | Updated: December 22, 2012 12:02 PM

जसजसे बांधकाम वर चढते तसतशी अधिकाधिक काळजी घ्यावी लागते. पाया घालून झाला की प्रत्यक्ष इमारत वर चढायला लागते. छोटय़ा इमारतींना काँक्रीटचा व इतर साहित्याचा दर्जा चांगला ठेवावाच लागतो. काढून दिलेल्या आराखडय़ाप्रमाणेच बांधकाम करावे. साहित्याची हलवाहलव करताना पूर्ण काळजी घ्यावी लागते. उंच ठिकाणी बांधकाम करण्यासाठी बांधलेली परांची नीट व्यवस्थित बांधलेली आहे ना याची खात्री करून मगच कामगारांना वर चढू द्यावे. अनेकदा परांचीतील बांबू तुटून अपघात घडतात. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची लहान मुले येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अगदी एकमजली बांधकाम असले तरी इमारतीला बाहेरून हिरव्या सेफ्टी नेट्स बसवाव्यात. साहित्य किंवा माणसे बाहेर पडून होणारे अपघात त्यामुळे टाळता येतील.  गगनचुंबी इमारतींचा सगळाच पसारा मोठा. अनेक मजली बांधकाम असल्यामुळे सगळीकडेच खूप काळजी घ्यावी लागते. सुरुवात आपण उद्वाहनापासून करू या. ज्या जागेत उद्वाहन बसवायचे त्या जागेत तळमजल्याच्याही खाली एक खोल खड्डा असतो.  संपूर्ण बांधकाम होत आल्यावरच उद्वाहन जोडतात. प्रत्येक मजल्यावर ही मोकळी जागा सेफ्टी नेटने बंद करावी. अन्यथा अपघातांना निमंत्रणच दिल्यासारखे होईल. उंच मजल्यांना सामान ने-आण करण्यासाठी लिफ्ट बसवलेल्या असतात. त्यांचीही सतत योग्य ती देखभाल करावी. अर्धवट बांधकामाला सर्व बाजूंनी सेफ्टी नेट्स बसवाव्यात. उंच ठिकाणी काम करताना कामगारांना खाली बघून चक्कर येऊन अपघात घडू शकतो. तसेच एखादी वस्तू जर उंचावरून पडली तर या जाळ्यांमुळे अडली जाऊन सरळ खाली येणार नाही. अति उंचीवरून पडणारा साधा खिळासुद्धा अत्यंत घातक ठरू शकतो. मग बांधकामाच्या ठिकाणी तर अनेक गोष्टी इकडे-तिकडे होत असतात. अनेक वेळा बांधकामाच्या ठिकाणी फार कचरा जमतो. अति उंचीच्या मजल्यांवरून तो खाली कसा आणायचा हा प्रश्न असतो. सरळ वरून खाली लोटून न देता याच कामासाठी वापरला जाईल असा एक मोठा शूट (पोकळ पाइप) उभारावा, जेणे करून त्यात टाकलेला कचरा इकडे-तिकडे न पसरता सरळ खाली गोळा करता येईल.
हेमंत वडाळकर
मराठी विज्ञान परिषद,पुरव मार्ग,चुनाभट्टी ,
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. -थँक यू कुकुर..
‘अरे फक्त दोनच मिनिटांसाठी बाहेर जातोय मी.. आलोच बघ जाऊन,’ असं म्हणून निघताना मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी लक्षात आली. दोनाची पाच मिनिटं करून त्याच्या आवडीची बिस्किटं येताना घेऊन आलो. अर्थात त्याचा रुसवा काढण्यासाठी!
दरवाजा उघडून आत आल्यावर पाहातो तर हा समोर हजर. रुसवा वगैरे अजिबात नाही. मला पाहिल्याचा आनंद इतका की, त्याची दखल घेतल्याशिवाय पुढे जाणं शक्य झालं नाही.
दोनपाच मिनिटांनी मी परतलो तर त्यात कसला आनंद आणि उत्साह? माझ्या चेहऱ्यावर असे भाव उमटलेले पाहून तो थोडा हिरमुसला. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा तो पुन्हा खुशीत आला. मग मी कान देऊन त्याचं म्हणणं ऐकलं.
‘अनकंडिशनल लव्ह’- विनाअट प्रेम याची तू सदैव महती गातोस. मी तुझ्यावर तस्संच प्रेम करतोय. तुझ्या येण्याजाण्यावर लक्ष ठेवून असतो. दिसलास की प्रेमाचं भरतं येतं. नाचावंसं वाटतं, उडय़ा माराव्याशा वाटतात. माझ्या लेखी ‘धिस इज अनकंडिशनल लव्ह’.. कसं रे कळत नाही तुला? आलाय मोठा माझ्यासाठी डॉगबिस्किट आणणारा! त्या बिस्किटांच्या अटीवर प्रेम करतो का तुझ्यावर असं ‘कुकूर’ म्हणाला. अगदी ठामपणे.
मी वरमलो. कुकुर म्हणाला, जरा डोळे उघडून पाहा.. मी हा असा आहे..
– प्रेमाचं माणूस घरी आलं की खूप आनंद नि उत्साहाने त्याचं स्वागत करतो. दिवसातून कितीही वेळा..
– दोन मिनिटांसाठी असेल की मैलभर चालणं असेल, भटकण्याची (जॉयराइडची) संधी मी सोडत नाही. चालायला खूप खूप आवडतं.
– बाहेरची मोकळी हवा अंगाला लागली, कानांवर वारं खेळून लागलं की मस्त वाटतं.
– झोप आली की डुलक्या काढतो. पुन्हा ताजातवाना. झोप म्हणजे झोपच. ताणून देतो, पण लोळत पडत नाही. उठल्याबरोबर तंगडय़ा पसरून आधी स्ट्रेच करतो मगच इकडे तिकडे करतो.
– मस्ती करायला बागडायला खूप मजा येते. मला आनंद झाला की नाचून- बागडूनच व्यक्त करतो.
– कोणी माझ्याशी बोलायला आलं की खूष होतो. वाटतं, नुसतं जवळ असलं की छान वाटतं. बोलायला कशाला पाहिजे?
– न आवडणाऱ्या गोष्टींवर भुंकतो, सहसा चावत नाही. कधी कधी तर नुसतं गुरगुरतो.
– हवेत उकाडा असला की नुस्तं पाणी पितो. भरपूर. सावलीत राहिलं, धावपळ केली नाही की त्रास होत नाही.
– मला खोटं प्रेम, खोटं खोटं हसू हे करताच येत नाही.
– मी जगतो, प्रेम करतो. त्याला तुम्ही म्हणे लॉयल्टी, प्रामाणिक असे शब्द वापरता. मला त्या शब्दांचा अर्थ कळत नाही. असंच जगायचं असतं ना?
– मी तुझ्यावर विनालोभ प्रेम करताना तुझ्यावर थोडा रुसलो तरी, तुला पाहताच सगळं विसरून जातो.
– पण तू रुसलेला असलास, कंटाळलेला असलास, थकलेला असलास की तुझ्याजवळ फक्त बसायचं, शांतपणे. यू नो इट हेल्प्स. तूही शांत होतोस.
होय रे..
आय लव्ह यू.. थँक्यू कुकूर!
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. -२२ डिसेंबर
१८७१ गव्हर्नर जनरल लॉर्ड एलनबरो यांचे निधन. भारतातील गुलामगिरीच्या निर्मूलनासंदर्भात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. १८४२ ते ४४ या काळात ब्रिटिशांकित भारताचे ते गव्हर्नर जनरल होते.
१८८७ भारतीय गणितींची गौरवशाली परंपरा स्वकर्तृत्वाने पुढे नेणारे गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा तामिळनाडूमधील तंजावर जिल्हय़ातील एरोड गावी जन्म.  शाळेतच त्यांना शून्य या आकडय़ाला शून्याने भागउत्तर एक येईल का? असा प्रश्न पडला होता. महाविद्यालयात गणित हा एकमेव आवडीचा विषय आणि अन्य सारे नावडते, यामुळे ते अन्य विषयांत अनुत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती बंद झाली. शिक्षण सुटले आणि संसारात पडले. त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टच्या कचेरीत नोकरी स्वीकारली. हिशेबनीस म्हणून नोकरी करीत असताना वयाच्या २३व्या वर्षी पहिला गणितातला शोधनिबंध लिहिला. हा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी’ नियतकालिकात छापून आला. प्रोफेसर गॉडफ्री हार्डी यांनी रामानुजन यांचे गणिती कार्य पाहून त्यांना इंग्लंडला बोलावून घेतले. यातूनच ‘हार्डी-रामानुजन-लिटलवूड सर्कल मेथड इन नंबर थिअरी’ व ‘रॉजर-रामानुजन आयडेन्टिटीज इन पार्टिशन इंटिजर्स’ यांची देणगी गणिताला मिळाली. अवघ्या ३२-३३ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कित्येक पिढय़ांना पुरेल एवढा गणिती वारसा दिला.
१९५३ राज्य पुनर्रचना प्रश्नांवर विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन झाल्याने भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न सोडविणे सोपे झाले.
डॉ. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची – सायगावमध्ये पंथांचा सुळसुळाट
दक्षिण व्हिएतनाममधील मुख्य शहर सायगावच्या परिसरात फोफावलेल्या होआ-हाओ या पंथाचा गुरू फूसो याला फ्रेंच राज्यकर्त्यांनी सोडले. त्यामुळे फू सो मातब्बर होऊन त्याने फ्रेंचांशी शत्रुत्व पत्करून नवीन आक्रमक जपान्यांशी संधान बांधले. फू सो भूमिगत होऊन त्याने आपल्या अनुयायांचे लहानसे सैन्य तयार करून त्याला जपानी लष्कराकडून शस्त्रास्त्रे मिळू लागली.
होआ-हाओप्रमाणे ‘काओ-दाई’ हा एक पंथही व्हिएतनाममध्ये होता. या दोन्ही पंथांना फ्रेंच किंवा जपान्यांबरोबर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडायचे नव्हते. त्यांचा मुख्य शत्रू होता, कॅथलिक धर्म व त्यांचे मिशनरी. परमेश्वराची आज्ञा झाल्यावर फ्रेंच व जपानी राज्यकर्ते जातील व त्यांच्याबरोबर ख्रिश्चन पाद्रीही जातील व आपल्या पंथाचा विस्तार होईल, अशी त्यांची अपेक्षा व समजूत होती. गुरू फूसो यास पकडू वेडा ठरविल्यामुळे होआऱ्हाओ पंथियांचा फ्रेंचांविरुद्ध संघर्ष चालू असताना जपानी आक्रमणाचा फायदा घेऊन उत्तर व्हिएतनाममध्ये हो चि मिन्ह याच्या प्रेरणेने जो राष्ट्रीय उठाव झालेला होता. त्या लढय़ाला होआ-हाओ पंथियांचा संघर्ष सहाय्यभूत ठरू लागला. परंतु काहीतरी कुरबूर होऊन होआ-हाओ पंथियांनी एका व्हिएतमिन्ह लष्करी ठाण्यावरच हल्ला केला. दुसरे महायुद्ध संपता संपता व्हिएतनाम (होचिमिन्हचे क्रांतिकारी सरकार) व होआ-हाओमध्ये चांगलीच जुंपली. कारण सर्व सत्ता आता व्हिएतमिन्हच्या हातात जाणार हे नक्की होते. १९४७ साली व्हिएतमिन्ह लष्कराने फू सो याला पकडून देहान्त शासन दिले. नंतर होआ-हाओ पंथाचे अनेक उपपंथ तयार झाले व प्रत्येक गटाचे छोटे सैन्य असे. यांचे म्होरके म्हणजे शस्त्रधारी गुंड असत व ते सायगाव बंदर व इतर सार्वजनिक ठिकाणी चिनी व इतर परदेशी व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करीत असत.
सुनीत पोतनीस- sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 22, 2012 12:02 pm

Web Title: navneet 19